
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मीरा भाईंदर मध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना फायनल वॉर्निंग देण्यात आली आहे. पाच पेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी उभे राहणार नाहीत, याची काळजी पोलिस प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. या ठिकाणी जमाव होणार नाही, त्यासाठी जमाव पांगवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे.
मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते आणि हिंदी भाषिक व्यापाऱ्यांचा मोर्चा काढू दिला जातो. ही दडपशाही असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जमलेल्या लोकांची धरपकड पोलिसांच्या वतीने केली जात आहे. मराठी माणसांवरच जबरदस्ती केली जात आहे, आम्ही कोणताही वाद घातलेला नाही, तरी जबरदस्तीने आमची धरपकड केली जात असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होणार होता. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि काहींना घरात नजरकैदेत ठेवले.
अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल – अतिरिक्त पोलिस आयुक्त…
यावर अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता शिंदे यांनी इशारा दिला आहे की, कोणत्याही नागरिकाने मोर्चासाठी एकत्र येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांनी सांगितले की शहरात, विशेषतः महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि स्थानकांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पूर्णपणे सतर्क आहेत. पोलिसांनी मीरा-भाईंदर परिसरात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासही बंदी घातली आहे. परवानगीशिवाय लोकांना मोर्चा काढण्यासाठी प्रवृत्त करणे बेकायदेशीर आहे आणि असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांना रात्रीच अटक…
मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. काशिमीरा पोलिसांनी अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले. मनसेच्या वतीने हिंदी भाषित व्यापारी विरुद्ध काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरी देखील आम्ही मोर्चा काढणार असल्याचे मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना रात्रीच ताब्यात घेतले आहे. यात अविनाश जाधव यांचा देखील समावेश आहे. त्यांना पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबरोबरच अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल ट्रॅक करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
बिहार निवडणुकीमध्ये फायदा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न – संदीप देशपांडे
ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे दुबे सारखे नेते, प्रक्षोभक विधान करत आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायच्या आहेत. मात्र, आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. आम्ही असल्या कोणत्याही घाणेरड्या वादाला बळी पडणार नाही. हे सर्व शड्यंत्र सुरू आहे. महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण करायचे षड्यंत्र भारतीय जनता पक्ष करत आहे. या षड्यंत्रात आम्ही बळी पडणार नाही. त्याचे नेते आताच का बोलले? आताच हे कुठून निर्माण झाले? हे जाणीवपूर्वक बिहार निवडणुकीमध्ये मध्ये याचा फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.