अहमदाबाद- विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं खरं, पण या जेतेपदाची त्यांना खरंच किंमत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याला कारण ठरलाय ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला एक फोटो. हा फोटो खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्शच्या एका कृतीमुळे याला उन्माद म्हणावं की मस्ती? असा प्रश्न क्रिकेट चाहते उपस्थित करू लागले आहेत. विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीचा अपमान करताना दिसून आला आहे. मिचेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मार्शच्या या कृतीमुळे मात्र क्रिकेटप्रेमी कमालीचे संतप्त झाले आहेत.
रविवारी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतानं आधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्माच्या सुरुवातीच्या तडाखेबाज खेळीनंतर विराट कोहली व के. एल. राहुल वगळता अन्य खेळाडूंना लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवातही अडखळत झाली. पहिल्या १० षटकांत ४१ धावांवर त्यांचे ३ गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या १९२ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय साकार झाला.
मिचेल मार्शने २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाचे प्रतिनिधित्वे केले होते. यावेळी ही तो वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग आहे. या सामन्यानंतर तो आपल्या गोलंदाजी किंवा फलंदाजीमुळे नव्हे तर ड्रेसिंग रुममध्ये केलेल्या कृत्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेऊन बसल्याचं दिसून येत आहे. हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा प्रकार समोर आला आहे. पॅट कमिन्सनं मिशेल मार्शचा खुर्चीवर बसून हातात एक बाटली असलेला फोटो शेअर केला आहे. पण या फोटोत खुर्चीवर रेलून बसलेल्या मार्शच्या पायाखाली चक्क विश्वचषक दिसत आहे. मार्शच्या बाजूलाही ऑस्ट्रेलिया सपोर्ट स्टाफपैकी एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. त्याचा हा फोटो स्वत: कर्णधार कमिन्सनं काढला की आणखी कुणी, हे स्पष्ट होऊ शकलं नसलं, तरी कमिन्सनं तो इन्स्टाग्राम स्टेटसवर ठेवल्यामुळे त्याचंही या कृतीला समर्थनच असल्याचं स्पष्ट होत आहे.
हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की , ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या ट्रॉफीचे हकदार नाहीत. तर आणखी एका युजरचं म्हणणं आहे की, ती वर्ल्डकपची ट्रॉफी आहे, त्या ट्रॉफीचा सन्मान करायला हवा. दरम्यान, मिशेल मार्शची ही कृती उन्मत्त असल्याची टीका क्रिकेट चाहते करत आहेत. काहींनी हा फोटो शेअर करून थेट आयसीसी व बीसीसीआयला कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रिय आयसीसी व बीसीसीआय, मिशेल मार्शनं त्याच्या पायाखाली विश्वचषक ठेवल्याबाबत मला चिंता वाटत आहे. त्याची ही कृती क्रिकेट खेळाच्या नीतीमूल्यांचा अवमान आहे. कृपया या प्रकाराचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती एका चाहत्याने एक्सवर (ट्विटर) केली आहे.