२८ सप्टेंबर/राजकोट : राजकोट वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारतीय संघाला २८६ धावांत रोखले. भारताने अखेरचा सामना गमावला असला तरी मालिकेत २-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि वॉशिंगटन सुंदर यांनी दमदार सलामी दिली. दोघांनी दहा षटकात ७४ धावांची सलामी दिली. वॉशिंगटन सुंदर १८ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर आजी-माजी कर्णधारांनी डाव सांभाळला. दोघांनीही संघाची धावसंख्या वाढवली. पण भारताची धावसंख्या १४४ झाल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली. रोहितने सहा षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ८१ धावांचे योगदान दिले.