मणिपूरमधील जिरिबाम येथे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर ताफ्यावर अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आज (दि.१४) हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
दरम्यान, मणिपूर पोलिसांनी रविवारी सांगितले की, इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यातून शस्त्रसाठा जप्त केला असून, यामध्ये AK-56 रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल (SLR), एक स्थानिक SLR, अनेक पिस्तूल, हँडग्रेनेड आणि 25 राऊंड्सचा समावेश आहे.
शोध मोहिम सुरु असताना हल्ला..
शनिवारी जिरिबाम येथे गोळीबाराची घटना घडली होती. आज सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम राबवली. हे पथक जिरीबाम जिल्हा पोलिस स्टेशन अंतर्गत मोनबुंग गावाजवळ असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये मूळचे बिहारचे सीआरपीएफ जवान अजय कुमार झा (४३) शहीद झाले. तर जिरीबाम पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकासह तीन राज्य पोलिस जखमी झाले आहेत.
गेल्या वर्षीपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचा भडका
गेल्या वर्षी म्हणजे ३ मे २०२३ पासून कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत १८०हून अधिक लोक मारले गेले आहेत. एप्रिल २०२४ मध्ये दोन सशस्त्र अनियंत्रित गटांमध्ये पुन्हा गोळीबार झाला होता. जिरीबाम भागात अलीकडे हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. जूनमध्ये, कुकी आणि मैतई समुदायांमधील संघर्ष सुरू असताना किमान 70 घरे आणि पोलिस चौक्यांना आग लावण्यात आल्याची घटना घडली होती. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे ५३ टक्के लोकसंख्या मैतेई समुदायाची आहे. ते मुख्यतः इम्फाळ खोऱ्यात राहतात, तर नागा आणि कुकींसह आदिवासी ४० टक्के असून हा समुदाय प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतो.