
पंढरपूर- आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर लोटला असून चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे.

विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी…
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.