
मुंबई- बांद्रा किल्ल्यावर मध्यरात्री झालेल्या दारूपार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या, संरक्षित हेरिटेज स्थळांपैकी एक असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूसह पार्टी झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला असून, या प्रकरणावरून सरकार, बीएमसी आणि उत्पादन शुल्क विभागावर तीव्र टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी हा व्हिडिओ ‘एक्स’वर शेअर करत राज्य सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर सवाल उपस्थित केले आहेत. चित्रे यांनी या घटनेमागे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे ‘ढोंगी हिंदुत्व’ आणि ‘लबाड संस्कृती’ असल्याचा घणाघात केला आहे.
हेरिटेज किल्ल्यावर पार्टीला परवानगी दिलीच कशी?…
अखिल चित्रे यांनी ‘एक्स’ समाज माध्यमावर पोस्ट करत ही घटना १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची असल्याचे सांगितले. स्थानिकांनीच ही पार्टी चित्रित केल्याचा त्यांचा दावा आहे.
चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रशासनाला थेट जाब विचारला आहे: “महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेला आणि मराठा इतिहासाची साक्ष देणारा बांद्रा किल्ला या हेरिटेज स्थळी दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्पादन शुल्क विभाग आणि BMC परवानगी देतातच कशी?” इतकेच नाही तर, या पार्टीच्या आयोजनात ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग देखील सामील असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
‘ढोंगी हिंदुत्व’ अन् लबाड संस्कृत.
या घटनेवरून चित्रे यांनी भाजपच्या राजकीय धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही, तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे. हेच भाजप आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व आणि लबाड संस्कृती आहे.”
सांस्कृतिक मंत्री शेलार कुठे आहेत?…
या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी विचारले, “नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष शेलार?”
मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन…
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून, यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. मी या पार्टीचा व्हिडिओ पाहिलेला नाही. मला याबाबत लोकांनी सांगितले आहे. पण पार्टीला परवानगी दिली असेल, तर नक्कीच कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ऐतिहासिक वारसास्थळावर झालेल्या या गैरप्रकारामुळे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. या गंभीर आरोपांनंतर आता राज्य सरकार, पर्यटन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग यावर काय स्पष्टीकरण देते आणि दोषींवर काय कारवाई करते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर