कर्जत : प्रतिनिधी (सुमित सुनिल क्षिरसागर) कर्जत मुरबाड शहापूर राष्ट्रीय महामार्गावरील चाहूची वाडी येथे दिनांक २३ रोजी सायंकाळी अपघात घडला आहे. मुरबाड बाजूकडून कर्जतकडे जाणारा ट्रक चाहूचीवाडी येथील वळणावर आला असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट वाडीच्या रस्त्याजवळ असलेल्या वाळकु ढोले यांच्या झोपडी वजा दुकानाला धडकून पुढे जाऊन उलटला. यावेळी झोपडीत असलेल्या अलका ढोले यांच्या अंगावर झोपडीची कौले आदी वस्तू पडल्याने त्याला दुखापत झाली तर ट्रकच्या चालक आणि सहायक यांना दुखापत झाल्याने त्यांना उल्हासनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या अपघातात ढोले कुटुंब थोडक्यात बचावले आहे. दरम्यान अपघात बाधित ढोले कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २३ मार्च रोजी इंदोर मध्यप्रदेश येथून पीठ आदी सामग्री घेऊन निघालेला ट्रक क्रमांक एमपी १४ एचबी ०४१२ हा शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून कर्जत दिशेकडे जात होता. सायंकाळच्या सुमारास हा ट्रक मुरबाड दिशेकडून कर्जत दिशेकडे जात असताना कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूचीवाडी भागात उतारावर चालक रवी सखाराम बुंदेला रा धरमपुरी मध्यप्रदेश याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वळणावर ट्रक वळण्याऐवजी तो थेट चाहूचीवाडी येथील रस्त्यावरून शेताकडे वेगाने निघाला. याच रस्त्याच्या कडेला वाळकु ढोले यांची झोपडी होती. या झोपडीत त्यांचे वडापावचे दुकान होते. यावेळेला वाळकु ढोले यांची पत्नी अलका ढोले या दुकानात होत्या तर काही गिर्हाईक देखील होती. ट्रक आल्याचे पाहताच ती गिर्हाईक बाजूला धावत गेली. मात्र अलका ढोले यांना धावायला देखील संधी मिळाली नाही. अशात ट्रक येऊन थेट त्यांच्या झोपडीला धडक देऊन तिची वाताहत करत पुढे जाऊन उलटला. तर झोपडीवरील कौले आदी गोष्टी अलका ढोले यांच्या अंगावर पडल्याने त्याला दुखापत झाली. तर समोर उभी असलेली वाळकु ढोले यांच्या दुचाकीला देखील ट्रकने धडक दिल्याने ती देखील मोडून पडली. तसेच ट्रक चालत रवी बुंदेला, सहाय्यक संतोष बटडे हे दोघे जखमी झाल्याने त्यांना उल्हासनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नेरळ पोलीस ठाणे अंकित कळंब दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी अपघाताची चौकशी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. दरम्यान हा अपघात वाळकु ढोले यांनी स्वतः पाहिला. त्यावेळी ते बाजूला लाकडे तोडण्याचे काम करीत होते. त्यामुळे ट्रक सैरावैरा येत असल्याचे पाहिल्याने ग्रामस्थांनी केलेली आरडाओरड ऐकून ते बायकोला वाचवायला धावले. मात्र झोपडीला ट्रकने धडक दिल्याने त्यांच्या अंगावर देखील वस्तू उडाल्या मात्र तरीही जिवाच्या आकांताने ते अलका यांना वाचवायला धावले. या अपघातात त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेली झोपडी वजा दुकान पूर्णपणे नेस्तनाबूत झाले आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.