ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
दिवा भागात भुमाफियांकडून उभारण्यात येत असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईच्या निमित्ताने बेकायदा बांधकामाला अभय दिले तर निलंबनाची कारवाई होईल, असाच संदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी इतर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे चित्र असून यामुळे बेकायदा बांधकामावरील कारवाईला वेग येण्याची चिन्हे आहेत
ठाणे महापालिका क्षेत्रात भुमाफियांकडून बेकायदा इमारती उभारणीची कामे सुरु आहेत. या बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिका होत आहे. भाजपचे आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेकायदा बांधकामांचा मुद्दा उचलून धरत कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वच सहाय्यक आयुक्तांना दिले होते आणि शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार ही कारवाई करण्याच्या सुचनाही केल्या होत्या. कारवाईसाठी लागणारे साहित्य, मनुष्यबळ आणि पोलिस फौजफाटा उपलब्ध होत नसल्यामुळे कारवाई करणे शक्य होत नसल्याची तक्रार काही सहाय्यक आयुक्तांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर प्रभाग समित्यांनी केलेल्या मागणीनुसार बांगर यांनी त्यांंना कारवाईसाठी लागणारे साहित्य, मनुष्यबळ आणि पोलिस फौजफाटा उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतरही दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख हे बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास दिरंगाई करीत असून त्याचबरोबर काही ठिकाणी केवळ दिखाव्यापुरती कारवाई करत असल्याची बाब आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
बेकायदा बांधकामावरील कारवाई केली नाही त्यामुळे निलंबन
बेकायदा बांधकामावरील कारवाई करण्यासाठी ज्या दिवशी यंत्रणा उपलब्ध करून दिली होती, त्याचदिवशी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दुसऱ्यादिवशी त्यांनी कारवाई सुरु केली पण, ती केवळ दिखाव्यापुरतीच होती. या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तरिही त्यांच्याकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती आयुक्त बांगर यांनी दिली.
जाहिरात :