
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ दरवर्षी शहीद जवान स्मारकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरवी दर दिवाळीत ‘फटाके कमी वाजवा आणि सैनिक/पोलीस कल्याण निधीला मदत करा’ असा उपक्रम राबवते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी जमविलेला ४५ हजार रूपयांचा निधी यावर्षी पोलीस कल्याण निधीला देण्यात आला.
या निधीचा धनादेश दि. ३ एप्रिल रोजी देवरुख पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शबनम मुजावर यांना विद्यार्थ्यांकरवी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कार्यवाह श्री शिरीष फाटक व न्यू इंग्लिश स्कुल देवरुखचे मुख्याध्यापक श्री कोकणी सर यांचे उपस्थितीत देण्यात आला. यावेळी पोलीस भगिनी, विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस कल्याण निधीला मदत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री. निखिल पाटील, उपनिरीक्षक मुजावर मॅडम व संस्था अध्यक्ष श्री. भागवत यांनी विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे आभार मानले तसेच हा उपक्रम राबविल्याबद्दल मुजावर मॅडम यांनी संस्थेचे देखील आभार मानले. हा उपक्रम संस्था गेली अनेक वर्षे चालवत असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये हुतात्मा सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण होतेच पण त्याचबरोबर देशासाठी काहीतरी चांगले काम करण्याची प्रेरणा देखील निर्माण होते अशी माहिती देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.