
दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला होता. त्यानंतर आता भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये शिंदे गटाला अवघ्या ४८ जागांवर निवडणूक लढवता येणार आहे.
मुंबई: राज्यात सुरु असलेल्या ऐतिहासिक सत्तासंघर्षाची खरी लढाई २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पाहायला मिळणार आहे. सध्या सत्तेत असलेले शिंदे-फडणवीस सरकार आगामी निवडणुका एकत्र लढवणार आहे. त्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात सध्या गाजत आहे. हे वक्तव्य खरे मानायचे झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागांवर तर शिंदे गट अवघ्या ४८ जागांवर निवडणूक लढवेल. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले तो पक्षाचा खासगी कार्यक्रम होता. याठिकाणी प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. त्यामुळे भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत स्तरावर २४० ते २४५ जागा लढण्याची तयारी सुरु केल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्याचवेळी शिंदे गटाच्या वाट्याला अवघ्या ४८ जागा आल्यास ते राजी होतील का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
