अश्विन अण्णा हैं तो मुमकिन है…! चेन्नईत बांगलादेशचा पराभव करत अश्विननं पाडला विक्रमांचा पाऊस….

Spread the love

भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या आर. अश्विननं या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. 38 वर्षीय अश्विन या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडला गेला.

चेन्नई :  भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं लक्ष्य होतं. ज्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाचा दुसरा डाव 234 धावांत गारद झाला. चौथ्या दिवशी (22 सप्टेंबर) उपाहारापूर्वीच सामना संपला. दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या आर. अश्विननं या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. 38 वर्षीय अश्विन या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडला गेला.

अश्विननं केले अनेक विक्रम-

अश्विननं दुसऱ्या डावात 88 धावांत सहा बळी घेतले. तत्पूर्वी, त्यानं भारताच्या पहिल्या डावात शानदार 113 धावा करत भारताला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेलं होतं. अश्विनचं ​​ते सहावं कसोटी शतक ठरलं. तसं बघितलं तर अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये 37व्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याच्या बाबतीत शेन वॉर्नची (ऑस्ट्रेलिया) बरोबरी केली आहे. या बाबतीत, अश्विनच्या पुढं फक्त मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) आहे, ज्यानं 67 वेळा ही कामगिरी केली आहे.

अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू-

मात्र, कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावात अश्विननं सातव्यांदा डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत तो शेन वॉर्न आणि मुरलीधरनसह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत फक्त रंगना हेराथ (श्रीलंका) त्याच्या पुढं आहे, ज्यानं चौथ्या डावात 12 वेळा हा पराक्रम केला. हे चौथ्यांदा घडलं जेव्हा रविचंद्रन अश्विननं कसोटी सामन्यात शतक झळकावलं आणि पाच बळीही घेतले. एकाच ठिकाणी दोनदा अशी कामगिरी करणारा अश्विन हा पहिला खेळाडू आहे. अश्विननं 2021 मध्ये चेन्नई इथं इंग्लंडविरुद्ध 106 धावा केल्या आणि 5/43 चा आकडा नोंदवला.

भारताचे जास्त विजय-

भारताचा कसोटी क्रिकेटमधला हा 179वा विजय ठरला. भारताच्या 92 वर्षांच्या कसोटी इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, जिंकलेल्या सामन्यांची संख्या हरलेल्या सामन्यांपेक्षा जास्त आहे. तसंच भारतानं 580 सामन्यांपैकी 178 सामने गमावले आहेत. तर 222 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला. बांगलादेशविरुद्ध भारताचा धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2017 मध्ये भारतानं हैदराबाद कसोटी सामना 208 धावांनी जिंकला होता.

🔹️कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा पाच बळी…

▪️67 मुथय्या मुरलीधरन (133 कसोटी)
▪️37 आर अश्विन (101)*
▪️37 शेन वॉर्न (145)
▪️36 रिचर्ड हॅडली (86)
▪️35 अनिल कुंबळे (132)

एकाच कसोटीत शतक आणि ५ बळी (सर्वाधिक वेळा)-

▪️5 इयान बोथम
▪️4 आर अश्विन*
▪️2 गॅरी सोबर्स/मुश्ताक मोहम्मद/▪️जॅक कॅलिस/शाकिब अल हसन/रवींद्र जडेजा

🔹️कसोटी सामन्यात भारत..

▪️सामने : 580
▪️जिंकले : 179*
▪️गमावले : 178
▪️ड्रॉ : 222
▪️टाय : 1

🔹️चौथ्या डावात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स…

▪️99 आर अश्विन
▪️94 अनिल कुंबळे
▪️60 बिशन बेदी
▪️54 इशांत शर्मा/रवींद्र जडेजा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page