
रत्नागिरी:- विठ्ठल.. विठ्ठल… जय हरी विठ्ठल…. च्या जयघोषाने रविवारी रत्नागिरी दुमदुमली. आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत वैष्णवांचा मेळा पहायला मिळाला. मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर व परटवणे ते विठ्ठल मंदिर अशा दोन दिंड्या हरिनामाचा गजर करत विठ्ठलमंदिरात दाखल झाल्या.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. सकाळी अभ्यंगस्नानानंतर विधीवत पुजाअर्चा झाली आणि त्यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिर खुले झाले. पहाटेपासूनच भक्तांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळपासून हरिनामाचा गजर मंदिर परिसरात दुमदुमत होता.
प्रथेप्रमाणे यावर्षीदेखील परटवणे भार्गवराम मंदिर येथून पारंपारिक दिंडी निघाली. परटवणे कुंभारवाडा, गाडीतळमार्गे ही दिंडी हरिनामाचा जयघोष करीत टाळ-मृदुंगाच्या तालावर भजनात दंग झालेले वैष्णव मोठ्या भक्तीभावाने मंदिरात दाखल झाले. याठिकाणी विधीवत पुजाअर्चा होत दिंडीतील भक्तांना थेट दर्शन देण्यात आले.
मारुती मंदिर येथून दुसरी दिंडी सकाळी सात वाजता विठ्ठल मंदिराकडे निघाली.पारंपारिक वेषभूषेत शहरातील नागरिक या दिंडीत सहभागी झाले होते. हातात विणा, डोक्यावर तुळस तर हातात टाळ आणि मृदुंग वाजवित भजनाच्या तालावर ही दिंडी भक्तीमय वातावरणात विठ्ठलमंदिरात दाखल झाली. यावेळी विविध संस्थांनी दिंडीतील भक्तांसाठी पाणी आणि प्रसादाची व्यवस्था केली होती. लायन्स क्लबचे गणेश धुरी यांच्या नेतृत्त्वात ही व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत रत्नागिरीच्या विठ्ठलमंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, भजने, कीर्तने झाली आणि त्यानंतर आषाढी एकादशीची सांगता झाली.