
चिपळूण : जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशासेविका आणि पर्यवेक्षकांना जानेवारी २०२५ पासून मानधन मिळाले नाही. चिपळूणमधील २७० आशा सेविका मानधनापासून वंचित आहेत. काम करूनही पैसे मिळत नसेल तर कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न आशा सेविका आणि गटप्रवर्तक करीत आहेत.
चिपळूण तालुक्यात २७० आशा सेविका आणि ११ गटप्रवर्तक आहेत. आशा सेविकांकडून ग्रामीण भागातील तसेच अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील गर्भवती महिला, स्तनदा मातांना आरोग्य सेवा पुरवली जाते. एड्स, मलेरिया, डेंगी आदी रुग्णांनाही सरकारच्या सेवा पुरविल्या जातात. ५२ प्रकारच्या सेवा ग्रामीण भागात आशा सेविका पुरवितात. त्यांना राज्य सरकार, केंद्र सरकारकडून मानधन दिले जाते. यापूर्वी केंद्राचा हप्ता वेळेत मिळत नव्हता, आता राज्याचा हप्ताही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आशा सेविकांमध्ये नाराजी आहे. राज्यातील कोणत्याही आशा सेविकेला जानेवारी २०२५ पासून मानधन मिळालेले नाही. राज्य सरकार मानधन देण्यास का चालढकल करीत आहे, असा प्रश्नही आशा सेविका विचारत आहेत.