मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर होताच मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला काय आवाहन केल? वाचा सविस्तर…
अंतरवली सराटी, जालना | 20 फेब्रुवारी 2024- मराठा आरक्षण विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिलेल्या आरक्षणाचं स्वागत आहे. पण हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. उद्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतची बैठक बोलावली आहे. सगळ्या मराठा बांधवांनी अंतरवली सराटीमध्ये या आंदोलनाची पुढची दिशा ठरवूयात, असं आवाहन मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
मनोज जरांगे काय म्हणाले?…
मराठा आरक्षणाबाबतचं विधेयक मंजूर झालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हे विधेयक मंजूर करणं आमच्या हिताचं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. या विधेयकाला विरोध करतानाच मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा समाजासाठी त्यांचा मुलगा म्हणून मी काम करतो आहे. त्यांच्यासाठीच लढत राहणार, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी हाताला असलेली सलाईन त्यांनी काढून टाकली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोवर उपचार घेणार नसल्याचं जरांगे म्हणाले.
निर्णयाचं स्वागत पण…
आम्ही इथून आधीही स्वागत केलं होतं. आताही स्वागत करतो. आमचं म्हणणं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्या. सगे सोयरेची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. आधीही सांगितलं होतं की हे नाकारण्याचा काही कारणच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. आज जे विधेयक मंजूर झालं, त्याचं आम्ही त्यासाठी आताही स्वागतच करतो. यात पोरांचं काही कल्याण होणार नाही. आमच्या हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आहे. त्याची अंमलबजावणी पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत, असं जरांगेंनी म्हणालेत.
उद्या अंतरवलीत बैठक…
उद्या दुपारी 12 वाजता अंतरवलीत बैठक होणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं. शक्यतो सर्वांनीच यावं. उद्या आंदोलनाची दिशा ठरवू. घाई गडबड नाहीच आहे ना. हरकती साठी यंत्रणा आहे. आणखी मनुष्यबळ वाढवा. आमची आणि त्यांची वैयक्तिक काही दुश्मनी नाहीये. आमचं येवढाच म्हणणं आहे की, त्यांनी आज त्या मागणीवर निर्णय घ्यायला पाहिजे होता. ज्यासाठी आक्रोश करतोय त्या माता माऊलींची चेष्टा करत आहात? सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.