मुंबई : उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का लागला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ द्यायचं कारणही सांगितलं. शिंदे यांच्यासोबत एकत्र काम केलं आहे, त्यांच्या कामाचा उरक मला माहिती आहे, असं दीपक सावंत म्हणाले. दीपक सावंत हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप-शिवसेना युतीच्या काळात आरोग्यमंत्री होते.
‘कोरोना काळात एकनाथ शिंदेंनी सेंटर उभी केली आणि काम सुरू केलं. त्यांच्याबरोबर आरोग्याशी निगडित काम करता येईल म्हणून शिंदे गटात प्रवेश केला आहे. हार्ड फिलिंग नाही, पण 3 वर्ष मी घरी होतो, आपण काम करू शकतो, म्हणून शिंदे गटात प्रवेश करत आहे,’ असं दीपक सावंत म्हणाले.
‘मागची 3 वर्ष मी काम मागत होतो, बाळासाहेबांच्यामुळे मी प्रथम आमदार झालो. द टायगर पुस्तकाचं प्रकाशन केलं तेव्हा मी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिलं, मला घरी का बसवलं? याबाबतचं कारण मला अजूनही कळालेलं नाही,’ अशी टीका दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.