दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणात ईडीच्या समन्सकडे सातत्यानं दुर्लक्ष करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात ईडी न्यायालयात पोहोचली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होईल.
नवी दिल्ली : दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणात ईडीच्या समन्सकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याबद्दल ईडीनं आता न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीच्या याचिकेवर 3 फेब्रुवारीला राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांच्यासमोर सुनावणी झाली. याप्रकरणी पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे.
केजरीवालांना पाच वेळा समन्स बजावले…
शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीच्या वतीनं एएसजी एसव्ही राजू, जोहेब हुसेन, ईडीचे उपसंचालक भानुप्रिया, ईडीचे सहायक संचालक जोगेंद्र, ईडीचे सहायक संचालक संदीप कुमार शर्मा हजर झाले. ते म्हणाले की, मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम 50 अंतर्गत ईडीनं अरविंद केजरीवाल यांना पाच वेळा समन्स बजावले. मात्र केजरीवाल यांनी पाचही वेळा समन्सकडे दुर्लक्ष केलं. ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. अतिरिक्त मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा यांनी ईडीचा आंशिक युक्तिवाद ऐकला आणि पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला करण्याचे आदेश दिले.
मनीष सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात…
माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं 4 ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी चौकशी केल्यानंतर अटक केली होती. सिसोदिया यांना यापूर्वी 26 फेब्रुवारी 2023 रोजी सीबीआयनं अटक केली होती. संजय सिंह यांचा जामीन अर्ज राऊस एव्हेन्यू कोर्टानं फेटाळला असून, त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयानंही मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.