रत्नागिरी, दि. 26 : आरजू टेक्सोल कंपनीकडून फसवणूक प्रकरणातील आणखी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय विश्वनाथ सावंत (३३, रा. पुनस-सावंतवाडी, ता. लांजा) याने आज (२६ जून) सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता; परंतु न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला असून, त्याला अटक करून २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
‘जॉब वर्क पध्दतीने काम घ्या. आम्हाला प्रोडक्ट तयार करून द्या, जास्तीत जास्त उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना रोजगाराची सुवर्ण संधी’ अशा स्वरूपाची जाहीरातबाजी करून आरजू टेकसोल कंपनीने सुमारे ५०० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी २३ मे २०२४ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादविसं चे कलम ४२०, ४०६ सह महाराष्ट्र हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये “आरजू टेकसोल” कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात प्रसाद शशिकांत फडके (३४, रा. घर नं. ७२, ब्राम्हणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी, ता.जि. रत्नागिरी) याला २८ मे आणि संजय गोविंद्र केळकर (४९, रा. घर नं. ३५०, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी-हातखंबा ता. जि. रत्नागिरी) याला २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. या दोघांना ३ जूनपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर झाली होती. सध्या हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
या गुन्ह्यातील अन्य आरोपी संजय विश्वनाथ सावंत याने आज दिनांक २६ जूनला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने आरोपी संजय सावंत याचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी तात्काळ सत्र न्यायालयात हजर राहून आरोपीची पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी संजय सावंत याला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये आर्थिक गुन्हे शाखेमार्फत आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, औरंगाबाद व सातारा जिल्ह्यातील बळी पडलेल्या एकूण ५२५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. तसेच फसवणूक झालेली रक्कम ५ कोटी ९२ लाख, ६९ हजार ८६६ इतकी आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. आरजू टेकसोल या कंपनीचे भाडे कराराने घेतलेले गोदाम, फॅक्टरी ऑउटलेट व त्यामधील कच्चा व तयार माल हा जप्त करण्यात आलेला आहे, तसेच या जप्त मुद्देमालाच्या लिलावासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात परवानगीची मागणी केली आहे. या कंपनीच्या बँक खात्यातून झालेल्या सर्व आर्थिक व्यवहाराचे मान्यताप्राप्त लेखपरीक्षकांकडून लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल.