मुंबई- मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज पार पडला. या दसरा मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. दहा बारा दिवसांपूर्वी मी नागपूरला गेलो होतो. मी शहरीबाबू आहे. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त केलं. माझं कर्तव्य म्हणून केलं. दहा रुपयात पोळी भाजी दिली कर्तव्य म्हणून दिली. मी कोरोनात काम केलं. ते कर्तव्य म्हणून केलं. मी नागपूरला गेलो. लोकांनी व्यथा सांगितल्या. सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही. भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो आहे. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद. असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला.
गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीच पाहिजे. पण मला प्रश्न पडला. तर गाय राज्यमाता झाली आहे. मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे. मग हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे. तर तो हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा. हे आमचं हिंदुत्व आहे. महागाईपासून दूर जाण्यासाठी गायीच्या पाठी लपत आहात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
रतन टाटा यांनी जेव्हा आपल्याला घरी भेटायला आले, तेव्हा त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. टाटांनी मीठ दिलं, पण आताचे उद्योगपती मिठागरं गिळत आहेत. रतन टाटा माझ्या घरी आले होते. ते म्हणाले की आपल्या दोघांना सारखाच वारसा लाभला आहे. माझ्यावर जेव्हा जेआरडींनी जबाबदारी सोपवली, तेव्हा काही काळ मी निर्णय घेऊ शकत नव्हतो, पण नंतर मी विचार केला, की जेव्हा जेआरडींनी मला काम करताना पाहिलं, तेव्हाच त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली. जशी माझी निवड जेआरडींनी केली, तशी तुझी निवड बाळासाहेबांनी केली आहे. कठीण काळात तू कसा वागतोस, निर्णय घेतोस, हे पाहिलं म्हणून तुझ्यावर जबाबदारी दिली. त्यामुळे तुला पटतील ते निर्णय घे, हेच बाळासाहेबांना अभिप्रेत आहे. मी बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.