*राजापूर-* शनिवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अनुस्कुरा घाटात कोसळलेली दरड आज सोमवारी सायंकाळी 6 वाजता म्हणजे 60 तासानंतरच्या कालावधी नंतर काढण्यात आली असून सदर मार्ग वाहतुकीसाठी चालू झाल्याचे सांगण्यात आले.
अनुस्कुरा घाटात तब्बल तीन दिवस भर पावसात दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. मार्गांवरील वाहतूक सुरु होण्यास अनेक अडथळे निर्माण झाले होते. माती हटवताना मातीच्या ढीगाऱ्याखाली मोठे दगड असल्याने व दगडांचा आकार मोठा असल्याने ते तीन ते चार वेळा ब्लास्ट करून हटवण्यात आले. सदर मार्ग बंद असल्याने मुंबई हून कोकणात अनुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक गेले तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पर्यायी मार्ग म्हणून अनेकांनी यावेळी गगनबावडा मार्ग निवडला होता.
गेल्या दोन तीन वर्षात लोकांना मुंबई हून कोकणाकडे येणारा जवळचा मार्ग म्हणून या मार्गाची माहिती मिळाल्याने अनेक लोक या मार्गाने कोकणात येतात, पुणे कोल्हापूर हून राजापूर सावंतवाडी ला येण्यासाठी देखील हा मार्ग लोकांना सोईचा वाटतो.
दिवसभरात पाचशे ते सहाशे वाहनांची वर्दळ या मार्गावर असते सणासुदीला तर हजारोच्या संख्येने या मार्गावर वाहतूक असते. अश्यावेळी दर पावसाळ्यात अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडतात, अनेक अपघातही होतात तरी सार्वजनिक बांधकाम विभाग या घाटाच्या सुरक्षितेकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसतं नाही. हे जर असंच राहिले तर एखाद दिवशी दरडीखाली मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारू शकत नाही अशी भीती व्यक्त करण्यात येतं आहे.