“सकारात्मक वातावरणाचा लाभ घेत खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करावी” : अनुराग ठाकूर.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | भोपाळ | जानेवारी ३१, २०२३.

देशामध्ये गेल्या पाच सहा वर्षात खेळासाठी अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आपल्या देशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी वैयक्तिक रित्या भेट घेत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे आणि खेळाडूंना काहीही कमी पडणार नाही याची हमी दिली आहे आता खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी केली पाहिजे असे आवाहन केंद्रीय क्रीडा व युवक मंत्री अनुराग ठाकूर यांनी येथे केले.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचे येथील तात्या टोपे क्रीडा संकुलात अतिशय शानदार सोहळ्यात श्री ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी राज्याच्या श क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधिया, केंद्रीय क्रीडा व युवक खात्याचे राज्यमंत्री नितीश प्रमाणिक हे उपस्थित होते.

श्री ठाकूर यांनी पुढे सांगितले की गतवर्षी हरियाणा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत बारा राष्ट्रीय विक्रम नोंदवण्यात आले होते आणि हे सर्व विक्रम महिला खेळाडूंनी नोंदविले होते ही अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे. यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेतही खेळाडूंनी असेच विक्रमी यश नोंदविले पाहिजे. श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. ॲथलेट अविनाश साबळे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर्स स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक मिळवित इतिहास घडविला तर निखत झरीन हिने जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आणखी एक दैदिप्यमान कामगिरी केली. या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीत युवा खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचवावे. केंद्र सरकार नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. क्रीडा क्षेत्रासाठी गेल्या पाच वर्षात केंद्र शासनाने अतिशय मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन जाहीर झाल्याची औपचारिक घोषणा करीत श्री चौहान यांनी सांगितले, “मध्यप्रदेश मध्ये गेल्या पाच सहा वर्षांमध्ये अनेक खेळांसाठी वेगवेगळ्या अकादमी सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंचे क्रीडा नैपुण्य ओळखून त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले आहेत. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणही दिले जात आहे. जागतिक स्तरावर चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना भरघोस शिष्यवृत्तीही सुरू करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंनाही राज्य शासनातर्फे रोख पारितोषिके दिली जात आहेत.”

यावेळी अविनाश साबळे व निखत झरीन यांनी आणलेली क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यशोधरा राजे सिंधिया यांनी स्वागत केले. या समारंभामध्ये महाराष्ट्राचे पथक प्रमुख म्हणून श्री. चंद्रकांत कांबळे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page