खेड :- मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्या मुळे कोकण वासियांना काहीसा दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतु पहिल्याच पावसात एक-दोन नव्हे, तर आठ ते दहा ठिकाणी कशेडी बोगद्याला गळती लागली आहे. हे पाणी राेखण्यासाठी ठेकेदाराकडून बोगद्यात पत्रे लावण्यात आले आहेत. तरीही गळती थांबलेली नाही. याबाबत तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली असून, त्यावर ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महामार्गावर धाेकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून दाेन किलाेमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे एकाच बोगद्यातून लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. या पहिल्याच पावसामध्ये कशेडी बोगद्याला ठिकठिकाणी गळती लागल्याचे समाेर आले आहे. या बोगद्यात पाण्याचे फवारे वाहनांवर आणि दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहेत. या प्रकारामुळे बाेगद्यातून प्रवास करणारे वाहनचालक आणि दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत.
बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने गळतीच्या ठिकाणी पत्रे लावले आहेत. मात्र, तरीही सिमेंटचे फेन्सिंग फोडून सात ते आठ ठिकाणी पाण्याचे झरे लागले आहेत. या मुळे प्रवासी धास्तावले असून बोगद्यातून प्रवास करण्याबाबत विचार करू लागले आहेत.