कल्याण- राज्यातील राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. अशातच कल्याण विभागातील राजकारणात देखील काहीसा बदल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातील अनेक आमदार, शाखाप्रमुख, शहराध्यक्ष यांनी देखील ठाकरे गटात बंड करून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नगरसेवक अमेय घोले यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता कल्याणमधील ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. ठाकरे गटातील कल्याणचे उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी आपल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला.
दरम्यान अरविंद मोरे हे कल्याणमधील ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते मानले जात होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला नक्कीच होईल. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमधील शिवसेना अधिक बळकट करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
अरविंद मोरे यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, जयवंत भोईर, श्रेयस समेळ, ,छायाताई वाघमारे , संजय पाटील, नेत्राताई उगले, मयूर पाटील, गोरख जाधव, अंकुश जोगदंड, अभिषेक मोरे व इतर नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण आणि मुरुबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्या खांद्यावर सोपवली.
अरविंद मोरे यांच्या सोबतच माजी शिक्षण मंडळ सदस्य व महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे शहराध्यक्ष डॉ. जितेंद्र भामरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सरचिटणीस राजीव कपोते, युवा सेनेचे विष्णू लोहकरे, दिनेश निचीत, सुजय कदम यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.