
पाचव्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रमांचा आढावा, गौरव सोहळा व प्रेरणादायी अनुभवांची पर्वणी..
चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूण सायकलिंग क्लबचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, दि. पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात आणि सायकलप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाले. दोन हजार वीस साली स्थापन झालेल्या क्लबचा हा पाचवा वर्धापन दिन होता. जुन महिन्यात वर्धापन दिन साजरा करण्याची परंपरा क्लबने यंदाही जपली.
कार्यक्रमाची सुरुवात भारती तारे यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालाने झाली. जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीतील क्लबच्या सामाजिक, सांघिक, वैयक्तिक प्रगतीला चालना देणाऱ्या उपक्रमांचे विस्तृत सिंहावलोकन करण्यात आले. सदस्यांच्या योगदानाला उजाळा देणारा हा अहवाल उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून गेला.
यानंतर संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात विविध स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सन्मानचिन्ह, मेडल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्लब सदस्यांच्या पाल्यांचा गुणगौरव, सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सत्कार, कुंभार्ली घाट फिनिश राईड पूर्ण करणाऱ्या सदस्यांना ‘फिनिशर मेडल’, दोन हजार चोवीस कॅलेंडर वर्षात सर्वाधिक अंतर सायकलिंग करणाऱ्या तीन पुरुष व महिला रायडर्सचा गौरव, तसेच ‘रायडर्स दा टशन’ चॅलेंज विजेत्यांचा सत्कार अशा विविध प्रकारांमध्ये गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले डॉ. तेजानंद गणपत्ये यांचे अनुभव कथन. त्यांनी नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण केलेली दक्षिण आफ्रिकेतील नव्वद किलोमीटर अंतराची जगप्रसिद्ध ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ याबाबत आपली प्रेरणादायी कहाणी मांडली.
याच कार्यक्रमात निशा आंबेकर आणि मनोज भाटवडेकर यांनी घेतलेल्या सायकलिंगविषयक क्विझने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. अचूक व वेगाने उत्तरे देणाऱ्या विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झालेल्या गप्पागोष्टी सत्रात आजपर्यंत तब्बल छेचाळीस हजार किलोमीटर सायकलिंग करणारे श्री. प्रशांत दाभोळकर यांनी आपला बाराशे किलोमीटरचा एलआरएम सायकलिंग प्रवास उलगडला. त्यांच्यासोबतच हा प्रवास पूर्ण करणारे राघव खर्चे यांनीही आपल्या अनुभवांमध्ये सहभागी होत प्रेरणादायी क्षण उपस्थितांसमोर उभे केले.
कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. यानंतर सदस्यांनी पुढील वर्षी बीआरएम, लॉंग डिस्टन्स टुरिंग, स्पर्धा, चॅलेंजेस व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत व्यक्त केले.