शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली आहे. तसेच हे प्रकरण सरकारनं नाहक रचलं असल्याचा शेराही न्यायालयानं दिला आहे. त्यामुळं आता किरीट सोमैया यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा तीव्र करणार असल्याची प्रतिक्रिया, अनिल परब यांनी दिली.
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे असलेल्या साई रिसॉर्टचं बांधकाम (Sai Resort Case) बेकायदेशीर आहे. याप्रकरणी सदानंद कदम आणि अनिल परब यांच्या बाबत किरीट सोमैया यांनी अनेक तक्रारी दाखल केल्यानंतर ईडीनं या दोघांवर कारवाई केली होती. अनिल परब यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावं लागलं. तर सदानंद कदम यांना ईडीनं अटक करून 11 महिने तुरुंगात ठेवलं होतं. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं राज्य सरकार आणि ईडीवर ताशेरे ओढले असल्याची माहिती, आमदार अनिल परब यांनी दिली.
ईडीची कारवाई जाणून-बुजून…
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे की, ईडीनं कशाच्या आधारावर ही कारवाई केली हे स्पष्ट होत नाही. ही कारवाई जाणून-बुजून केली आहे. त्यामुळं 11 महिने सदानंद कदम यांना तुरुंगात का ठेवलं ?असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला आहे. ही कारवाई अयोग्य असून जर या व्यक्तींनी पक्ष बदलला तर त्यांनी केलेलं कृत्य कायदेशीर होईल का? असा सवालही न्यायालयानं उपस्थित केला आहे, असं परब यांनी सांगितलं.
सोमैया विरोधात आता दावा तीव्र : या प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी आपल्याला गेली अडीच वर्षे नाहक त्रास दिला आहे. त्यामुळं आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना त्रास झाला. त्यामुळं सोमैया विरोधात आपण शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे, तो दावा आता अधिक तीव्र करणार असा इशारा परब यांनी दिला आहे.
कोकणातील पर्यटनावर घाला…
सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात आपलं निरीक्षण नोंदवताना एका केंद्रीय मंत्र्याचा बंगला पाण्यात आहे. त्याबाबत काय राज्य सरकारनं कारवाई केली असा सवाल उपस्थित केला आहे. तर कोकणातील सर्व बांधकामांची चौकशी करून अहवाल न्यायालयाने मागवला आहे. यामुळं कोकणातील पर्यटनाच्या मुळावरच आता घाव बसणार आहे आणि याला किरीट सोमैयाच जबाबदार आहे, असंही परब म्हणाले.