
मुंबई : आरोपांवर आरोप केले जातात मात्र आरोपपत्रामध्ये नावच नाही. अंमलबजावणी संचालनालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात नुकतेच आरोपपत्र सादर केले आणि यातील महत्त्वाची बाब म्हणजे या आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परबयांचा उल्लेख नाही. ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला होता. पण ज्याप्रमाणे आरोप केले जात होते, त्याप्रमाणे आता तपासात परब यांचा सहभाग आढळला नाही किंवा त्यांच्याविरोधात काही पुरावे सापडले नाहीत का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
अनिल परब हे एकटेच असे नेते नाहीत ज्यांच्यावर आरोप करण्यात आले. यापूर्वी अजित पवार यांच्यावर सुद्धा असे आरोप केले होते. पण मात्र आरोपपत्रामध्ये त्यांचंही नाव नव्हतं. त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही यापूर्वी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांच्या बँक खात्यात फक्त एक कोटी सापडले आणि वसुलीचे आरोप खोटे ठरले. मात्र या केलेल्या आरोपांमुळे एखाद्याची बदनामी तर होतेच पण त्याचं नुकसान सुद्धा होतं. यासंदर्भात अनिल परब यांनी कोर्टात दावा करत हे आरोप खोटे असून आपल्या बदनामीसाठी केल्याचा उल्लेख केला होता.