रत्नागिरीतील आणखी एका शिक्षकाचे प्रताप उघड; संतप्त पालकांची शाळेत धाव…

Spread the love

*रत्नागिरी प्रतिनिधी –* तू फार सुंदर आहेस… तू मला आवडतेस… शाळेच्या बाहेर मला भेट… अशा आशयाचे मेसेज करणारा आणखी एक लंपट शिक्षकाचे प्रताप त्याच शाळेत उघडकीस आले आहेत. ३ मुली त्या शिक्षकाविरोधात पुढे आल्या आहेत. याविरोधात मंगळवारी काही पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली. मात्र आपले बिंग फुटलेय, आपले काही खरे नाही हे लक्षात आल्यानंतर तो शिक्षक शाळेतून पसार झाला.

सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या रत्नागिरीच्या संस्कृतीला काळीमा फासणारे प्रकार रत्नागिरीत उघडकीस येऊ लागले आहेत. गुरु आणि शिष्याचे नाते हे फार वेगळे आहे, मात्र याच नात्याला कलंक लावण्याचे प्रकार दोन दिवसांत उजेडात आले आहेत. एकाच शाळेत दोन वासनांध शिक्षक आणि त्यांच्या वासनांध लिला यांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सोमवारी एकाला बदडले

पहिला प्रकार सोमवारी उजेडात आला. लागवडीचे शिक्षण देणारा शिक्षक गुलाबाची कलमे कशी बांधायची? याचे धडे देत असतानाच नको त्या विषयात तो शिक्षक शिरला आणि कपडे फाटेपर्यंत त्याला मार खावा लागला. सध्या हा शिक्षक पोलिसांच्या ताब्यात असून ही घटना ताजी असतानाच अन्य एक प्रकार उघडकीस आला आहे.

नवा प्रताप घडवणार्‍या नव्या शिक्षकाचे काही मेसेज पालकांच्या हाती लागले. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी मंगळवारी थेट शाळेकडे धाव घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यादेखील पालकांसमवेत होत्या. काही पालकांनी ते मेसेज वाचून दाखवले. तू फार सुंदर आहेस, शाळेच्या बाहेर भेटायला ये, अशा आशयाचे मेसेज असल्याचे सांगण्यात आले.

या नव्या वासनांध शिक्षकाने काही मुलींना अश्‍लिल मेसेज केले होते, ही बाब आता कालच्या प्रकारानंतर पुढे आली आहे. तसेच याबाबत वाच्यता केल्यास तुम्हाला नापास करेन, अशी धमकीदेखील दिल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या शिक्षकाविरोधात पालकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

शाळेत पालक आलेत, आता आपली काही खैर नाही, हे लक्षात आल्यानंतर शाळेत उपस्थित असलेला शिक्षक गाडी तेथेच टाकून शाळेतून पसार झाला. त्या शिक्षकाबाबत विचारणा केली असता तो रजेवर असल्याचे पालकांना सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तो शिक्षक शाळेत आला होता, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

सोमवारप्रमाणेच मंगळवारीदेखील पालक संतप्त होऊन शाळेत आले होते. शाळा व्यवस्थापनाला त्याची माहिती मिळाल्यानंतर शाळेत पुन्हा राडा होणार, हे पाहून व्यवस्थापनाने पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधून जादा कुमक मागवून घेतली. क्यूआरटीसह शहर पोलिसांचे एक पथक शाळेत दाखल झाले होते.

यावेळी त्या शिक्षकाला काही पालकांनी कॉल केला, तुम्ही ताबडतोब शाळेत या, तुमचे प्रताप आम्हाला कळले आहेत. आमच्याकडे तुमचे मेसेज आहेत, असे फोनवरुन त्या शिक्षकाला पालकांनी सांगितले. मात्र तो शिक्षक फारच माजलेला होता. त्याने तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे फोनवरुन सांगितले. त्यामुळे पालक अधिकच संतापले.

या प्रकारानंतर पालक  आणि व्यवस्थापन समिती यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी व्यवस्थापन समिती चौकशी करून या नव्या शिक्षकावर कारवाई करेल, असे सांगण्यात आले. मात्र पालकांचे त्याबाबत समाधान झाले नाही. त्या शिक्षकाला आमच्या समोर आणा असा पवित्रा पालकांनी घेतला होता.

मंगळवारी शाळेत आलेल्या पालकांनी त्या वादग्रस्त शिपायाबाबत तक्रारी केल्या. हा शिपाई नशेबाज आहे, नेहमी तो नशेतच शाळेत असतो, अशा नशेबाज शिपायाकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला.

एकामागोमाग एक सलग दोन दिवस वासनांध शिक्षकांचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अजून असे अनेक प्रकार उघडकीस येतील, असा संशयदेखील काही पालकांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांची भरती झाली त्यावेळी कोणती गुणवत्ता पाहून भरती करण्यात आली? असेदेखील पालकांचे म्हणणे आहे.

*‘त्या’ लंपट शिक्षकाला पोलीस कोठडी…*

सोमवारी पोलिसांनी पोस्को गुन्ह्याअंतर्गत अटक केलेल्या प्रथमेश नवेले याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page