आणि त्याने करून दाखवले.. वेल डन प्रसाद देवस्थळी…डॉ. तेजानंद गणपत्ये …दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचा झेंडा…

Spread the love

रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रविवारी रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणमधील डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी झेंडा रोवला. या दोघांनीही साधारण 11 तास 30 मिनिटांत मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रसाद देवस्थळी येत्या १३ जून रोजी रत्नागिरीमध्ये दाखल होणार असून त्यांच्या स्वागताची जंगी तयारीची सुरू झाली आहे. रत्नागिरीकरांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

धावनगरी रत्नागिरी अशी ओळख करून देणारे प्रसाद देवस्थळी हे फक्त स्पर्धा आयोजित करतातच असे नाही तर स्वतः देशभरातील विविध मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉनमध्येही धावत आहेत. कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये ते प्रथमच धावले. आज सकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार ९.३० ला आफ्रिकेत स्पर्धा सुरू झाली. मजल, दरमजल करत देवस्थळी यांनी मॅरेथॉन पूर्ण केली. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक असलेल्या देवस्थळी यांचे लाईव्ह लोकेशन सर्वजण पाहत होते आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शुभेच्छा, अभिनंदनाचे मेसेज सुरू होते.

धामापूर तर्फे संगमेश्वर गावचे सुपुत्र असलेले प्रसाद देवस्थळी आफ्रिकेतून प्रवास करून भारतात परततील. १३ जून रोजी ते रत्नागिरीत दाखल होतील. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, तसेच सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनच्या टीमतर्फे आणि रत्नागिरीतील धावपटूंतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे ते रत्नागिरी शहरातील बहुदा पहिलेच धावपटू असावेत. त्यामुळे रत्नागिरीकरांकडून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे.

कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वांत जुनी, प्रसिद्ध नामांकित अल्ट्रा मॅरेथॉन आहे. यंदा स्पर्धेचे ९८ वे वर्ष होते. पिटर्समारीबर्ग ते डरबन हे ९० किमी अंतर १२ तासात पार करायचे होते. ५ डिग्री ते २२ डिग्री अशा विषम वातावरणाचा सामना करून, अनेक चढ- उतार, अडथळे पार करत देवस्थळी व डॉ. गणपत्ये यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. डॉ. गणपत्ये यांनी यापूर्वी 2 वेळा लोहपुरुष, सायकलिंग मध्ये एस आर ‘किताब मिळवले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page