नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला भीषण आग; सुदैवाने प्रवाशी बचावले…

Spread the love

नाशिक- नाशिकमध्ये चालत्या एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत बस जळून खाक झाली आहे. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये प्रवासी देखील होते, बसला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन समिती पथकातील सदस्यांनी प्रवाशांना सुरखरूप बाहेर काढलं आहे, या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे. ज्या शिवशाही बसला आग लागली ती बस नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती.

नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शिंपीटाकळी फाटा येथे ही दुर्घटना घडली, शिवशाही बस (क्रमांक एम एच ०९, एफ एल ०४७७) ही नाशिकहून छत्रपती संभाजी नगरकडे आज जात असताना दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास धावत्या बसमधून इंजिनच्या बाजूने धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने तत्काळ बस थांबवली व बस मधील पाच ते सहा प्रवासी घाईने खाली उतरले, त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला व या आगीत ही संपूर्ण बस जळून खाक झाली.

25 प्रवाशांना घेऊन निघालेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्यामुळे प्रवाशी घाबरले. मात्र बसचे चालक आणि वाहक यांनी न घाबरता प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला करून थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठा अपघात टाळला गेला. बसच्या चालक आणि वाहकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आगीच्या या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान व स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page