
जनशक्तीचा दबाव न्यूज | श्रीहरीकोटा | सप्टेंबर २८, २०२३.
भारताच्या चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरशी संपर्क साधण्याचे इस्रोचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप यश आलेले नाही. वैज्ञानिक दिवस रात्र त्यांचं काम करत आहेत. मात्र, त्याचवेळी चांद्रयान-३ चा एक पेलोड चंद्रावर अजून सक्रीय आहे. चंदाच्या पृष्ठभागासंदर्भातील माहिती सातत्यानं इस्त्रोच्या कमांड अँड कंट्रोल स्टेशनकडे पाठवत आहे.या पेलोडचं नाव स्पेक्ट्रो-पोलरिमेट्री ऑफ हैबिटेबल प्लॅनेट अर्थ असं आहे. गेल्या ५२ दिवसांपासून याचं काम सुरु असून आतापर्यंत पुरेशा प्रमाणात माहिती त्या उपकरणानं इस्रोकडे पाठवली असून अजून बऱ्याच कालावधीपर्यंत ते सुरु राहील. स्पेक्ट्रो-पोलरिमेट्री ऑफ हैबिटेबल प्लॅनेट अर्थ चंद्राच्या चारी बाजूला फिरुन अभ्यास करेल. याद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग इस्रोची टीम एक्सोप्लॅनेट ग्रहांच्या कक्षांच्या अभ्यासासाठी करेल. एक्सोप्लॅनेट हे सौरमंडळाच्या बाहेरचे पिंड असतात. ज्यामध्ये पृथ्वीसारखी वैशिष्ट्ये असतात. यामुळं दुसऱ्या ग्रहांच्या शोधांसाठी इस्रोला फायदा होणार आहे.
सध्या जगभरातील अंतराळ संशोधन संस्था सौरमंडळाच्या बाहेर ग्रह आणि ताऱ्यांच्या शोधाच्या दिशेनं पावलं टाकत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताला स्पेक्ट्रो-पोलरिमेट्री ऑफ हैबिटेबल प्लॅनेट अर्थकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची आशा आहे. इस्रोच्या प्रमुखांनी SHAPE उपकरण निर्धारित वेळेदरम्यान संचलित केलं जाऊ शकतं असं सांगितलं. ज्यावेळी पृथ्वीकडून दृश्यता चांगली असेल त्यावेळेस संचलित होतं आणि माहिती गोळा करतं. आम्हाला पेलोडचे उद्देश पूर्ण करण्यासाठी पुरेशी माहिती मिळाली आहे. मात्र, आम्ही SHAPE ला संचलित करणं सुरु ठेवणार आहोत. माहितीचा अभ्यास करणे आणि त्यातून कोणता शोध लागल्यास त्या संदर्भातील घोषणा करण्यासाठी कित्येक महिने लागतील, असं इस्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले.