मंडणगड(प्रतिनिधी)- :‘‘लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कार्य करणारे गोपीनाथजी मुंडे यांचे कर्तृत्व हिमालयाच्या उंचीचे होते. त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय, वैचारिक, सहकार, शिक्षण आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. गोपीनाथजी मुंडे यांचे नेतृत्व दुरदर्शी व समाजाला दिशा देणारे असून खरोखरच ते एक सामान्यातला असामान्य नेता होते.’’ असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी केले. ते येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘‘लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचे जीवन व कार्य’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी संस्थेचे सहकोषाध्यक्ष श्री. सुनिल मेहता, संचालक श्री. संतोष चव्हाण, श्री. प्रकाश शिगवण, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, श्री. सुनिल घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचे जीवन संघर्षमय असून त्यांनी समाज जीवनावर आपला अमिट ठसा उमविटला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर काढलेल्या संघर्ष यात्रेव्दारे त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले. आदिवासी, पारधी तसेच भटके-विमुक्तांसाठी त्यांच्या पुढाकारामुळेच आश्रमशाळा सुरू झाल्या. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला. संस्था व आपल्या महाविद्यालयाच्या जडणघडणीत गोपीनाथजी मुंडे यांचे योगदान अतिशय मोलाचे असल्याचे दादा यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे डॉ. विनोदकुमार चव्हाण यांना 2024 चा ‘ग्लोबल ईमिनेंट रिसर्चर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल तर प्राणीशास्त्र विषयाचे डॉ. शैलेश भैसारे यांना 2023 चा ‘टॉप फिप्टी ईमिनेंट टिचर्स पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धपुतळयास मा. दादांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे तर शेवटी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयाच्या प्रांगणात जयंतीनिमित्त सायंकाळी लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या अर्धपुतळयासमोर ‘दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.