
माणसाचं जीवन क्षणभंगुर आहे हे आपल्या सर्वांना माहित असलेलं त्रिकालाबाधित सत्य आहे. मग जे काही क्षण आपल्या वाट्याला आले आहेत त्यात माणसं जोडत जगायला, एकमेकांना साथ सोबत द्यायला काय हरकत आहे! हे जीवन सार साधं सोप्पं करून सांगणारे आमचे आदरणीय धोंडूदादा पाटील यांची जीवनयात्रा आज संपुष्टात आली.
सालोशी गावाला आज कांदाटी – कोयना – सोळशी भागात मिळूनमिसळून आनंदात आणि एकजुटीने जगणारा गाव असं संबोधलं जातं. गावात माणसांना आणि त्यांच्या विविधांगी विचारांना एकसंघ बांधणारे आमच्या गावचे पाटील म्हणजेच श्री. धोंडु देवजी शेलार यांच्या आकस्मिक निधनाने आम्ही सर्व सालोसकर शोकाकुल झालो आहोत.
आमच्या धोंडू दादांनी आम्हाला गावाचा सर्वांगीण विकास साधताना सर्वांचा विचार कसा घ्यायचा, सर्वांना लाभ कसा पोहोचवायचा आणि सर्वांची खरी साथ कशी घ्यायची याची बाराखडी प्रत्यक्ष कृतीतून शिकवली.
हा विकास साधताना शेतीचे नवनवीन प्रयोग करणं, पाण्याचे स्रोत शोधणं आणि त्याचे उत्तम नियोजन करणं, आणि महत्वाचे म्हणजे एक गाव म्हणून एकजुटीने सर्वांचा हातभार लावुन हे प्रयोग यशस्वी करण्याचं त्यांचं कौशल्य आणि नेतृत्व आम्ही काल पर्यंत अनुभवू शकलो हे आमचे भाग्यच आहे.
सालोशी गावाचे आम्ही ग्रामस्थ मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी वणवण भटकायला लागतो. आमच्या डोंगरातील झऱ्याचा प्रवाह कमी होत चालला होता. अशातच एका संस्थेच्या माध्यमातून तांत्रिक समज वाढवून हा झरा अधिक चांगल्या पद्धतीने बांधायला धोंडू दादांनी साथ दिली. आणि कालच संपूर्ण गावकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी डोंगरावर झरा बांधायला मोर्चेबांधणी केली. सर्वांनी मिळुन झऱ्याचे काम सुरु केले. तिथेच काही गावकऱ्यांनी सर्वांसाठी जेवण तयार केले आणि सर्वांनी मिळुन एकत्र रान भोजनाचा सामुहिक आनंद घेतला.
आज सकाळी तुळशीची पुजा करतानाच त्यांना आकस्मिक भोवळ आली. मुंबईकडे उपचारासाठी आणताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
या आमच्या कांदाटी नदीच्या खोऱ्यात रस्ते नाहीत कि प्राथमिक आरोग्य सुविधा नाहीत. कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून आम्हाला आमच्या विकासाचा वाटा अजूनही मिळाला नाहीय. आमची मूल्याच्या आधारावर जगणारी माणसं उपचारांशिवाय जीवन यात्रा संपवत आहेत.
मात्र आमच्या आदरणीय धोंडू दादांनी दाखवलेल्या हक्काच्या आणि प्रयत्नांच्या अवघड वाटेवर आम्ही निरंतर चालणार आहोत. आमच्या धोंडु दादांच्या या अचानक जाण्यानं आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र यातून सावरायला त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वादच आम्हाला मदत करतील.
अशा माणुसकीच्या वाटेवर चालण्याचा आदर्श देणाऱ्या, अखेरच्या क्षणापर्यंत गावासाठी झटणाऱ्या आदरणीय धोंडू दादांना विनम्र अभिवादन!
- समस्त सालोशी तसेच जनशक्तीचा दबाव परिवार