
दापोली :- महावितरणचे दापोली येथील उपकार्यकारी अभियंता यांना ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दापोली येथे रंगेहात पकडले आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अमोल मनोहर विंचूरकर यांनी इलेक्ट्रिक ठेकेदाराकडे त्याच्या पक्षकाराकडे बसविण्यात येणाऱ्या ११० केव्हीए विजभार व विजरोहित्र या कामाच्या एस्टीमेटला मंजुरी देवून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील ५० हजारांची रक्कम ठेकेदाराकडून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंता अमोल विंचूरकर यांना आज दुपारी १.४७ वाजता रंगेहात पकडले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, हवालदार विशाल नलावडे, पोलीस शिपाई हेमंत पवार, प्रशांत कांबळे सहभागी झाले होते.