एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खऱ्या शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री असा करत शहा यांनी भाषणाला सुरवात केली. पाकिस्तानने आजवर भारतात अनेक हल्ले केले. मात्र पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे काम केले आहे.
▪️‘सत्तेसाठी ते काँग्रेससोबत’
▪️डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी सभा
▪️राहुल गांधी, शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र
▪️अमित शहा उद्धव ठाकरे टीका
पालघर (वसई): दहशतवादी कसाबला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी हातमिळवणी केली असून ते त्यांच्या मांडीवर बसले आहेत. असे करताना लाज वाटत नाही का, अशी घणाघाती टीका वसई येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांनी सोमवारी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही त्यांनी लक्ष्य केले. भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी शहा यांची जाहीर सभा वसईच्या सनसिटी मैदानात सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विवेक पंडित, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार राजेंद्र गावित यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खऱ्या शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री असा करत शहा यांनी भाषणाला सुरवात केली. पाकिस्तानने आजवर भारतात अनेक हल्ले केले. मात्र पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे काम केले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी हे पंतप्रधान होऊ शकत नाहीत आणि झाल्यास पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. मतपेढी कमी होईल या भीतीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण असतानाही शरद पवार, सुप्रिया सुळे त्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीला देशाची चिंता नाही. सोनिया गांधी या केवळ आपल्या मुलाला पंतप्रधान करण्याची स्वप्ने पाहत आहेत. दुसरीकडे शरद पवार-सुप्रिया सुळेंना, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना, लालूप्रसाद यादव आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र केवळ नरेंद्र मोदी हेच देशाच्या विकासासाठी धडपडत आहेत, असेही शहा म्हणाले.
यावेळी शहा यांनी मोदी सरकारने साधलेल्या उपलब्धींची माहिती दिली. अन्न, वस्त्र, निवारा यांसह विविध योजना राबवणे, आदिवासी समाजासाठी अनेक विकासात्मक कामे, महिला आरक्षण, देशाची अर्थव्यवस्था सुधारणे आणि कलम ३७० हटविण्यासह लिंक रोड, बुलेट ट्रेन, मेट्रोचे जाळे अशी अनेक कामे मोदी सरकारने केली आहेत, असे ते म्हणाले. तसेच वसई विरारमध्ये सूर्या प्रकल्पाचे १८५ एमएलडी पाणी देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले असून रोरो सेवा, गॅस पाइप लाइन आदी कामे केल्याचा दावा त्यांनी केला.
‘विरोधकांना पाकिस्तानविषयी प्रेम’..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची प्रशंसा केली. आज आपल्या देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा याला उबाठा गटातर्फे प्रचारात उतरल्याचे सांगत हे बघून बाळासाहेबांच्या मनाला यातना होत असतील असे ते म्हणाले.