
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि देवरुख आंबेडकरनगर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम रावजी कदम उर्फ आप्पा यांचे बुधवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
राजाराम कदम गुरुजी यांची बुधवारी सकाळपासुनच तब्येत बिघडल्यामुळे त्यांना साडवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सलाईन चालु असतानाच दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. राजाराम कदम गुरुजींना तालुक्यात आप्पा या नावाने
ओळखले जात होते. शिक्षकी पेशामध्ये असताना त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. सुमारे ३५ वर्ष ते शिक्षकी पेशात कार्यरत होते. उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते. समाजाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय बौध्दमहासभा देवरुख विभागाचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले होते. देवरुख स्मारक समिती, पुतळा समितीमध्ये ते अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने देवरुख विभागाचा एक भक्कम आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परीवार आहे.