
प्रधानमंत्री आवास योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार..
*गुहागर (ता. गुहागर) –* प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ वाटपाच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा संशयाचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यातील एका लहानशा गावात सध्या कार्यरत असलेल्या महिला सरपंचांच्या तिन्ही मुलांना एकाचवेळी घरकुले मंजूर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.
गावातील नागरिकांनी याविषयी तीव्र संताप व्यक्त करत हे लाभ मिळवण्यासाठी रेशनकार्डांचे विभाजन करून नियमांचा गैरवापर झाल्याची शक्यता वर्तवली आहे. “एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांना घरकुले मंजूर होणे हे केवळ योगायोग नसून योजनात्मक हेतूने केलेले नियोजन वाटते,” असा आरोप गावातील काही जागरूक नागरिकांनी केला आहे.
अनेक गरजू वंचित, तरीही एकाच घरातील तिघांना लाभ…
या गावात अजूनही अनेक कुटुंबे प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. गावात बाजारपेठही नसताना, सार्वजनिक सुविधा अपुऱ्या असताना, घरकुलासाठी प्रामाणिक अर्ज करणारे अनेक गरजू नागरिक लाभापासून वंचित आहेत. अशावेळी विद्यमान सरपंचांच्या कुटुंबातील तिघांना घरकुले मंजूर होणे म्हणजे ‘एकाच झाडाखाली सावली शोधणाऱ्या’ प्रवृत्तीचे प्रतीक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार…
या प्रकरणाची गंभीर दखल घेत गावातील काही नागरिकांनी गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भिलारे म्हणाले, “संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. कोणत्या निकषांवर ही घरकुले मंजूर झाली, याची तपासणी करून अहवाल सादर करण्यात येईल.”
प्रशासकीय प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची मागणी…
सध्या तरी प्रशासनाकडून तपास सुरू असून, चौकशीअंती सत्यता उघड होईल. मात्र, या प्रकारामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभ वाटपावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, ही योजना गरजूंपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचावी आणि लाभार्थ्यांची निवड केवळ राजकीय जवळीक नाही तर प्रत्यक्ष गरज ओळखून व्हावी.