मध्यपूर्वेत धोक्याची घंटा, इराणनं जप्त केलं इस्रायलचं जहाज; भारताकडून ॲडव्हायझरी जारी….

Spread the love

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं शनिवारी इस्रायलचं जहाज ताब्यात घेतलंय. त्यामुळं मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. त्याचवेळी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सध्याची परिस्थिती पाहता, सर्व भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

तेल अवीव (इस्रायल)- Iran Seizes Israeli Ship : इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं शनिवारी इस्रायलचं एक जहाज ताब्यात घेतलंय. सुत्रांच्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायलचं एमएससी एआरआयईएस जहाज जप्त केल्यानंतर या भागात तणाव वाढण्याची शक्यता आहे. जप्त केलेलं MSC जहाज लंडनस्थित Zodiac Maritime Group च्या मालकीचं आहे. याबाबत टाइम्स ऑफ इस्रायलनं इराणी वृत्तसंस्थेचा हवाला देत वृत्त दिलं आहे. अहवालानुसार, एमएससी जहाज शुक्रवारी दुबईच्या किनाऱ्यावरील होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाताना शेवटचं दिसलं होतं. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराण आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव वाढला आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं मध्य पूर्वेमध्ये मोठा संघर्ष होत आहे.

मध्यपूर्वेत तणाव वाढला….

इराण कधीही इस्रायलवर हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलीय. अहवालानुसार, सीरियातील इराणी दूतावासावर इस्रायलनं केलेल्या संशयित हल्ल्यानंतर इराण आणि पश्चिम यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान जहाज जप्त करण्यात आलं आहे. ओमानचे आखात होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे. हा पर्शियन गल्फचा एक अरुंद भाग आहे. ज्याद्वारे एकूण जागतिक तेलाच्या 20 टक्के तेल येथून जातं. त्याचवेळी, अलीकडच्या काही दिवसांत इराणकडून इस्रायलवर मोठा हल्ला होण्याची शक्यता पाहता अमेरिका हाय अलर्टवर आहे. सध्या या भागात प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे. व्हाईट हाऊसनं शुक्रवारी सांगितलं की, गेल्या आठवड्यात इस्रायली हल्ल्यात तीन इराणी जनरल मारले गेल्यानंतर इराणकडून हल्ल्याचा धोका कायम आहे. सध्या या भागात प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे. इराण इस्रायलवर ‘मोठ्या हल्ल्याची’ धमकी देत ​असल्याचा इशारा बिडेन यांनी या आठवड्यात दिल्यानंतर अमेरिकेला त्याच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमकडून परिस्थितीबद्दल वारंवार अपडेट्स मिळत आहेत.

भारताकडून ॲडव्हायझरी जारी…

त्याचवेळी इराणच्या हल्ल्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, भारत, ब्रिटन आणि फ्रान्ससह इतर अनेक देशांनी इस्रायलमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रवास मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे की, “प्रदेशातील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जे सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहत आहेत त्यांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून आपली नोंदणी करून घ्यावी.” त्याचवेळी, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले, “आम्ही या घटनेवर बारकाईनं लक्ष ठेवत आहोत.”

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page