
अकोला- अकोल्याचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे ७४ व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोग या आजाराशी झुंज देत होते. आज शुक्रवारी आमदार गोवर्धन शर्मा यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. ७४ व्या वर्षी आमदार गोवर्धन शर्मा यांची प्राणज्योत मालवली.
गोवर्धन शर्मा हे अकोला पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. गोवर्धन शर्मा हे गेल्या पाच टर्मपासून भाजपचे आमदार होते. गोवर्धन हे नितीन गडकरी यांच्या जवळचे नेते मानले जायचे. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असणारे अशी अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांची ख्याती होती.
गोवर्धन शर्मा हे गोपीनाथजी मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर, प्रमिला टोपले, वसंतराव देशमुख, संजय धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात देणारे पश्चिम विदर्भातील नेते म्हणून त्यांना नावाजलं जायचं. त्यांच्या निधनाने पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाल्याचं बोललं जात आहे.
भाजपचे आमदार गोवरधन शर्मा यांच्यावर अकोला शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यावर उद्या शनिवारी दुपारी तीन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून बस स्थानक, गांधी रोड, सिटी कोतवाली मार्गे निघणार आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने गोवर्धन कुटुंबावर दु:खाच डोंगर कोसळला आहे. गोवर्धन शर्मा यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी गंगादेवी शर्मा असा परिवार आहे.