प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे व श्री. अनिकेत पटवर्धन यांच्या माध्यमातून मंत्री चव्हाण यांनी घेतली प्रसंगाची माहिती.
शुक्रवार | फेब्रुवारी २३, २०२३.
राजापूर तालुक्यातील मूर गावचे रहिवासी आणि प्रसिद्ध व्यावसायिक श्री. भास्कर सुतार यांच्या आजिवली, ता. राजापूर येथील लाकूड गिरणी (सॉ मिल) ला लागलेल्या भीषण आगीत चिरकामासाठी असलेली लाकडे आणि मशिनरी जळून अक्षरशः भस्मसात झाल्याने सुतार कुटुंबियांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. यावेळी परिसरातील लोकांकडून या दुर्दैवी घटनेबद्दल खेद व्यक्त केला जात आहे.
या घटनेची वार्ता भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महिला मोर्चा संयोजिका सौ. शिल्पा मराठे यांना समजताच त्यांनी तात्काळ याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकण भाजपा नेते ना. रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहायक श्री. अनिकेत पटवर्धन यांना सूचित केले व तातडीची आर्थिक मदत करण्याबाबत विनंती केली.
श्री. अनिकेत पटवर्धन यांनी घटनेचे गांभीर्य ना. चव्हाण यांच्या कानावर घालून या प्रकारात सुतार कुटुंबियांची तात्काळ मदत करण्याविषयी चर्चा केली. यानंतर रात्री उशिरा रु. पाच लक्ष रकमेची व्यवस्था करत सौ. शिल्पा मराठे यांनी तात्काळ श्री. भास्कर सुतार यांना सुपूर्द करण्याबाबत सूचना करण्यात आली. मदतीची रक्कम हातात मिळत असतानाच ना. चव्हाण यांनी श्री. भास्कर सुतार यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सुतार यांना नव्याने उभे रहाण्यासाठी सल्ला दिला. सोबत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. यावेळी श्री. भास्कर सुतार भावनाविवश झाले. त्यांनी ना. रविंद्र चव्हाण, श्री. अनिकेत पटवर्धन आणि सौ. शिल्पा मराठे यांचे केलेल्या सहृदय मदतीबद्दल आभार मानले.