चिपळूण : अजितदादा शब्दाला पक्का आहे, अजितदादा खोटा वादा कधीच करीत नाही. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणच्या विकासाच्या प्रगतीसाठी सातत्याने आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिली. चिपळूण येथे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने शनिवारी सायंकाळी ते बोलत होते. खोटं बोल, पण रेटून बोल, अशी भूमिका विरोधकांची आहे. एक वर्ष कोरोनाचा काळ गेला, एक वर्ष आम्ही विरोधी पक्षात होतो.
उरलेल्या तीन वर्षात राज्यात आम्ही वेगवेगळ्या योजना आणल्या. करोडो रुपयांचा निधी समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी दिला. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून या मतदार संघाच्या विकासासाठी अवघ्या तीन वर्षात करोड रुपयांचा निधी दिला गेला. शेखर निकम माझ्याकडे आले आणि मी त्यांना मोकळ्या हाताने पाठवलं, असं कधीच झालं नाही. शेखर निकम यांनी मतदार संघात २ हजार चारशे ९० कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत, त्याचा कार्यअहवाल त्यांनी प्रकाशित केला आहे. आजवर चिपळूणला जेवढे आमदार झाले, त्या सगळ्या आमदारांमध्ये अवघ्या तीन वर्षात इतका निधी कुणीही आणला नव्हता, असे सांगत आमदार निकम यांच्या कामाचेही ना. पवार यांनी कौतुक केले.
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारील चौपाटी येथे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ना. अजित पवार यांची शनिवारी जाहीर सभा झाली. चिपळूण-संगमेश्वरमधून प्रचंड जनसमुदाय या सभेला लोटला होता. या सभेत अजितदादा पवार यांनी जनसन्मान यात्रा नेमकी कशासाठी काढली जात आहे, याचे स्पष्टीकरण केले. अनेक वर्षे तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. आम्ही समाजासाठी काय काय योजना आणल्या, पुढील पाच वर्षात आम्ही काय करणार आहोत, हे सांगण्यासाठी जनसन्मान यात्रा त्यांनी सांगितले. चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांच्या निधीतून काम करण्यात आले. १५४ कोटींची ग्रॅव्हिटीची पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीसाठी टेंडर निघाले आहे, असेही त्यांनी सांगितले. मी दहावेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. विरोधकांनी कितीही खोटा प्रचार केला, तरी अजित पवार शब्दाला पक्का आहे, कोणीही मायचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.
या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, कोकण संघटक अजित यशवंतराव, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, माजी सभापती शौकत मुकादम, पूजाताई निकम, जयंद्रथ खताते, दिशाताई दाभोळकर, साधना कोत्रे, नितीन ठसाळे, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, रमेश राणे, दादा साळवी, बाबू साळवी, आदिती देशपांडे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, पंकज पुसाळकर, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, अजय बिरवटकर, समीर काझी, राकेश साळुंखे, डॉ. राकेश चाळके, पांडुरंग माळी, जयवंत जालगावकर, मुजफ्फर मुकादम, आरपीआयचे राजू जाधव, साहिल आरेकर, मीनल काणेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले.