ठाणे :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आज मुंबईत झालेल्या दोन्ही गटाच्या बैठकांमध्ये एकमेकांना इशारा देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची एकमेकांवरील टीका ही अधिक लक्षवेधी ठरली. पवार गटाचे मुख्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोरी केलेला एकही आमदार वाचणार नाही, ते घरी जातील, असा इशारा देत “माझ्या बापाला शरद पवारांना रक्तबंबाळ आणि जखमी करणाऱ्या अजित पवार यांना तत्व नसल्याने ते पराभूत होतील”, अशी भविष्यवाणी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता रोज सकाळी बोलून पक्षाचे वाटोळे करणाऱ्यांप्रमाणे आमचे आमदार पक्षातून घालविणाऱ्या ठाण्याचा पट्टा म्हणजे जितेंद्र आव्हाड हा राष्ट्रवादी संघटनेचेही वाटोळे केल्याशिवाय राहणार नाहीत, असे ठाम मत व्यक्त करीत आव्हाडांवर सडकून टीका केली.
आव्हाडांना लक्ष करणे म्हणजे शरद पवारांवर वार अशी चर्चा आता रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करीत भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होऊन सर्वांना धक्का दिला. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्ह हे आमचेच असल्याचा दावा त्यांनी करीत शरद पवार यांना आव्हान दिले. सुमारे ४० आमदार आमच्याकडे असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात असताना शरद पवार गटाची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि पवारांचे कट्टर समर्थक जितेंद्र आव्हाड यांना मुख्य प्रवक्ता बनवून त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतर आव्हाड यांनी बंडखोरी विरोधात आवाज बुलंद करीत ९ मंत्र्यांवर कारवाई करण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यापासून पवारांचे फोटो वापरू नये हे सांगण्यापर्यंत काम केले. बंडापूर्वी अजित पवार यांच्याविरोधात कुणी थेट बोलण्याची हिंमत करीत नसे. त्यात आव्हाडांचाही समावेश होता. दुसरीकडे आव्हाड हे शरद पवारांचे लाडके होते. अनेकदा पवारांची भूमिका ही जितेंद्र आव्हाड यांच्या मुखातून मांडली जाते, असे राष्ट्रवादीत म्हंटले जाते. एवढा विश्वास त्यांचा आव्हाडांवर आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना आव्हाडांना रोखता आले नाही. त्यातून वसंत डावखरे विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष हा डावखरे यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्या वादातून आव्हाड यांना एकदा आमदारकी आणि मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची चर्चा रंगली होती. तो वाद पुढे सुरूच राहिला आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. डावखरे गटातील दुसरे आमदार सुभाष भोईर यांचेही आव्हाड यांच्यासोबत जमले नाही. त्यांनी शिवसेनेशी संधान बांधले. तर पंधरा वर्षांपूर्वी आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकले तर नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन्ही आमदारांच्या भाजपवासी होण्यास आव्हाड जबाबदार असल्याचा आरोप अजित पवार यांनी करून नव्या वादाला तोड फोडले आहे.
वास्तविक माजी मंत्री गणेश नाईक आणि वसंत डावखरे यांच्यापुढे आव्हाड यांचे ठाणे जिल्ह्यात फारसे स्थान नव्हते. ते पवार यांच्यासोबत राज्यातील राजकारणात सक्रिय होते. त्यातून अजित पवार आणि आव्हाड यांच्यात फारसे जमले नाही. पवार हे आव्हाडांना दोन हात दूरच ठेवत असल्याचे चित्र होते. वसंत डावखरे यांच्या निधनानंतर आव्हाडांचे पट्टे शिष्य नजीब मुल्ला यांना अधिक ताकद देऊन अजितदादांनी आपला वेगळा गट निर्माण केला आणि तोच मुल्ला गट आता आव्हाड यांच्याविरोधात आंदोलने करताना दिसत आहे. कधी काळी अजित दादांना एकही शब्द न बोलणारे आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत राहून दादांना जाहीर आव्हान देताना दिसत आहेत. त्यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना अपात्र ठरविण्यासाठी पत्रव्यवहार करताना दिसत आहेत. त्यामुळेच उपमुख्यमंत्री पवार यांनी आव्हाड हे राष्ट्रवादीचे वाटोळे करेल, असा मत व्यक्त करीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या जोडीला नेऊन बसविले आहे .