लवकर राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितली ‘ही’ तारीख…

Spread the love

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

*छत्रपती संभाजीनगर :* एक तारखेपर्यंत नवीन सरकारबाबत निर्णय होईल अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी दिली. गुरुवारी दिल्लीत तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल, त्यात खेळीमीळीच्या वातावरणात निर्णय होईल. लवकरच राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. कार्यकर्त्यांना काहीही वाटलं तरी कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे महत्त्वाचं आहे. सुरुवातीला वेगळी गोष्ट होती असं देखील अजित पवार यांनी सांगितलं. एका विवाह सोहळ्यानिमित्त अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस शहरात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

*दिल्लीत मिळणार अंतिम स्वरूप :*

“23 तारखेला विधानसभा निवडणुकीत इतिहासातील पहिल्यांदा असा एकतर्फी निकाल लागला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानायला पाहिजे. गुरुवारी युती मधील तिन्ही पक्षाचे प्रमुख दिल्लीला जाणार आहेत, त्यावेळी एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय होईल. सरकार स्थापन झाल्यावर लगेच हिवाळी अधिवेशन होईल त्याची तयारी करायची आहे. मात्र, जवळपास सर्व मंत्री अनुभवी असल्यानं काही अडचणी येणार नाहीत. केंद्रातून जास्तीतजास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणाला कोणती मंत्रिपदे त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या पक्षातील नेत्यांचा राहील. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना काहीही वाटत असलं तरी, कोणाला किती जागा मिळाल्या हे देखील लक्षात घ्यायला हवं” असं राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.


*तुम्ही तुमचं बघा आता :*

“नवीन सरकार स्थापन करत असताना अजित पवार यांना पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री करा असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. त्यावर आता फुकटचा सल्ला कोणी देऊ नका, अशी टीका अजित पवार यांनी केली. त्यांच्या पक्षातील आमदारांशी कुठलाही संपर्क नाही. आमचा पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत ते सक्षम आहेत, आता तुम्ही तुमचं बघा. आम्ही निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतली. त्यात गटनेता आणि इतर निर्णय घेण्यात आले, आता सर्वांनी मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार माना असं सर्वांना सांगितलं. त्यामुळं निवडून आलेले सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात गेले आहेत” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

*ईव्हीएमबाबत न्यायालयाचं म्हणणं महत्वाचं :*

“ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयानं जे सांगितलं ते सर्वांनी ऐकलं असेल. लोकसभेत आम्ही दोष दिला नाही, आता कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी असे आरोप विरोधकांना करावा लागतात. इतर राज्यांमध्ये ज्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस ईव्हीएम चांगलं होतं आणि आता विरोधात निर्णय लागला की त्यात दोष आहे. कोणत्या देशात काय केलं जातं यावर बोललं जातं, शेवटी जनताच सर्व ठरवते. कोणी कितीही आंदोलनं केली तरी निवडणूक आयोग आणि न्यायालय सांगते ते बरोबर आहे. दारुण पराभव झाला तो कोणाच्या माथी मारायचा तर ईव्हीएमला दोष द्यायचा, कार्यकर्त्यांना संभाळण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे.” असा आरोप अजित पवार यांनी केलाय.

*काही बातम्या नसल्या की पुन्हा चर्चा :*

“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासून अशा चर्चा या होत आहेत. बातम्या नसल्या की, अशा पद्धतीची चर्चा ही वारंवार केली जाते अशी टीका त्यांनी केली”.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page