नगर- अहमदनगरच्या फकीरवाडा भागात रविवारी संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकावत काही तरुणांनी नाच केला. तसेच या मिरवणुकीत त्यांनी घोषणाबाजी केल्याचाही आरोप केला जात आहे. याप्रकरणी भिंगार कँप पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवरून राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. अशातच काही वेळापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारला की, ‘महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन केलं जातंय का?’ त्यावर अजित पवार म्हणाले, ‘औरंगजेबाचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही’.
अजित पवार म्हणाले, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन कसं कोणी करेल आणि ते का करावं? उगीचच त्या घटनेला वेगळं स्वरूप देऊ नका. अफझल खान असेल किंवा औरंगजेब असेल या लोकांचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. कोणीही त्यांचं समर्थन करणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल, समाजात एकमेंकांबद्दल अडी निर्माण करण्याचं किंवा तेढ निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
दरम्यान कोल्हापूरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी आज सकाळी हिंदूत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.अशात या आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण लावलं असून अनेक ठिकाणी दगडफेकीसारख्या घटना देखील घडल्या आहेत. पोलीसांनी सौम्य लाठी चार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.दरम्यान या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.