मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून यादी जाहीर करण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फाॅर्मचे वाटप केले आहे.
यामध्ये दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ,छगन भुजबळ यांच्यासह एकूण १७ जणांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश विटेकर, संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, बाबासाहेब पाटील, अतुल बेनके यांना एबी फाॅर्म देण्यात आले आहेत.
एबी फॉर्म मिळाल्यानंतर भरत गावित यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला एबी फॉर्म दिलेला आहे. माझा मतदारसंघ हा राखीव आहे. नवापूर मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेला परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. मी नक्की जिंकून येणार आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल अजितदादा, सुनील तटकरे यांचे आभार. तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मी येत्या २४ तारखेला फॉर्म भरणार आहे. जनता जनार्दन माझा विजय नक्की करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिरामण खोसकर म्हणाले की, काँग्रेसकडे आम्ही दोन महिने जात होतो. पण त्यांनी ऐकले नाही. मग आमची फसवणूक होईल असं वाटलं आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये आलो. इथे एबी फॉर्म घ्यायला आमची ५०० लोकं आली आहेत. मग निवडणूक कशी होईल ते बघा. सकाळी ८ वाजता मला फोन आला आणि लगेच आम्ही या ठिकाणी आलो. दादांनी मतदारसंघात जाऊन काम करायला सांगितलं आहे. सगळे लोक एका बाजूला आलेत, तर ती बंडखोरी राहिली नाही. विरोधकांची यादी अजून येत नाही. पण विजय आमचाच होणार आहे, असे त्यांनी म्हटले.