मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळाले आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष; अजिंक्य नाईक यांचा विजय…

Spread the love

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांच्या रुपानं मुंबई क्रिकेट असोसिएशनला आतापर्यंतचा सर्वात तरुण अध्यक्ष मिळालाय.

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली. काँग्रेस नेते भूषण पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागं घेतल्यानं सचिव अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक यांच्यात थेट लढत झाली. अजिंक्य नाईक यांना 221 मतं तर संजय नाईक यांना 114 मतं मिळाली. या निवडणुकीत 377 मतदारांपैकी 335 जणांनी मतदान केलं, तर 42 मतदार अनुपस्थित राहिले. अजिंक्य नाईक यांनी मोठा विजय मिळवत संजय नाईकांचा 107 मतांनी दारुण पराभव केला. विशेष म्हणजे अजिंक्य नाईक यांच्या रुपानं मुंबई क्रिकेट असोसिएशनला सर्वात तरुण अध्यक्ष मिळाला. तर संजय नाईक यांच्या पराभवामुळं भाजपा नेते आशिष शेलार यांना धक्का बसला.

काळेंच्या निधनानंतर आज मतदान :

अमोल काळे यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली होती. यानंतर लगेच सायंकाळी मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अजिंक्य नाईक आघाडीवर होते. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक रिंगणात उतरले होते. 10 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये अमोल काळे यांच्या निधनानंतर आज वानखेडे स्टेडियमवर अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. अजिंक्य नाईक 2015 पासून एमसीएसोबत काम करत आहेत. आधी मार्केटिंग कमिटीमध्ये नंतर अपेक्स कौन्सिल सदस्य, नंतर सचिव आणि आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. या निवडणुकीत 329 क्लब मतदार आणि 47 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हे मतदार होते. आज जवळपास 80 टक्क्यांहून जास्त मतदान झालं. अजिंक्य नाईक यांना 221 मतं तर संजय नाईक यांना 114 मतं मिळाली आहेत. 107 मतांनी अजिंक्य नाईक यांचा विजय झाला.

विजयानंतर काय म्हणाले अजिंक्य नाईक :

“क्रिकेटर आणि क्लबचे सदस्य यांचा हा विजय आहे. महिला पुरुष सगळे क्रिकेटर आमच्या समर्थनात होते. ही दुःखाची निवडणूक होती, हा विजय अमोल काळेंचा आहे. त्यांचा वारसा पुढं चालवण्यासाठी निवडणूक लढलो होतो,” अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली आहे. तसंच शरद पवार असतील आणि सगळ्याच पक्षातील नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलं. क्रिकेटसाठी असंच काम सुरु राहील. माझ्या सारख्या तरुणावर सगळ्यांनी विश्वास ठेवला. मायक्रो लेव्हल पासून ते मोठ्यात मोठी अश्या सगळ्याच गोष्टी मुंबई क्रिकेटसाठी करायच्या आहेत. रणजी चषक आणि भारतीय संघाला क्रिकेटर देणं हे आमच उद्दिष्ट असल्याचं देखील नाईक म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page