खेड: तालुक्यातील लोटे एमआयडीसी पुन्हा एकदा हादरली असून आठवड्याभरात दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी पुष्पर केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले होते. तर आज मंगळवारी रात्री उशिरा एक्सेल इंडस्ट्रीजमध्ये वायुगळती झाली. यात बाधित झालेल्या चार जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोटे केमिकल एमआयडीसी चर्चेत आली आहे. या वायुगळतीच्या दुर्घटनेनंतर घटनेनंतर लोटे परिसरातील काही नागरिकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दगडू चाळके, वेदिका चाळके, जयश्री चाळके, विधी चाळके याच चार जणांना वायू गळतीचा त्रास झाल्याने घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात लोटे एमआयडीसीत एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये वायूगळती झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत चार जणांना या वायूमुळे मोठा त्रास होत असल्याने त्यांना घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोटे परिसरात असलेल्या चाळके वाडीतील चार नागरिकांना घरडा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये एका तीन वर्षीय बालिकेचाही समावेश आहे. दरम्यान आता या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.