लखनऊ- उत्तरप्रदेशातील आग्रा येथे हवाई दलाचं मिग २९ हे लढाऊ विमान कोसळलं. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर लगेच आग लागली. पायलटसह दोघांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते या दुर्घटनेतून बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी अपघातग्रस्त विमानापासून जवळपास दोन किलोमीटरवर पायलट आणि त्याचे सहकारी आढळून आले.
हे MiG 29 लढाऊ विमान कागारौल-सोनिया गावाजवळच्या एका शेतात कोसळलं. हे लढाऊ विमान जमिनीवर कोसळताच पेट घेतला. हा अपघात कसा घडला याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. काही तांत्रिक बिघाड होता का? यामागे आणखी कोणते कारण होते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानाने पंजाबच्या आदमपूर येथून उड्डाण भरलं होतं. सरावासाठी ते आग्राकडे जात होते. त्याचवेळी ही घटना घडली. हवाई दलानं चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच आग्रा कॅन्टॉनमेंटमधून लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त विमान आगीत जळून खाक झाले आहे. आग्रा येथील एका गावाजवळच्या शेतात लढाऊ विमान कोसळलं. रहिवासी वस्तीपासून दूर अंतरावर हे विमान कोसळलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हे विमान गावाजवळच्या एका शेतात कोसळलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला. मिग २९ हे लढाऊ विमान अनेक वर्षांपासून हवाई दलाच्या सेवेत आहे.