महाराष्ट्रासाठी नव्हे; तर देशासाठी खेळण्याचे ध्येय ठेवावे.

Spread the love

▪️ महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया गेम्स मध्ये अधिकाधिक पदके मिळवावी, पण आपल्याला भारतासाठी खेळावयाचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत आपल्या क्षमतेच्या शंभर टक्के इतकी कामगिरी करावी, असे आवाहन आंतरराष्ट्रीय खेळाडू शकुंतला खटावकर, शांताराम जाधव व निखिल कानेटकर यांनी केले.

▪️ मध्यप्रदेश मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 साठी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा नगरीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील सहभागी खेळाडूंना खटावकर, जाधव व कानेटकर यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जेष्ठ कबड्डी प्रशिक्षक सचिन भोसले, महाराष्ट्राचे पथक प्रमुख चंद्रकांत कांबळे, नोडल अधिकारी अनिल चोरमुले तसेच वरिष्ठ अधिकारी सुहास पाटील, व्यवस्थापक अरुण पाटील व श्रीमती अडसूळ आदी यावेळी उपस्थित होते.

▪️ खेलो इंडिया गेम्स हे नवीन खेळाडूंसाठी आपले कौशल्य दाखविण्याची हुकमी संधी आहे या संधीचा खेळाडूंनी मनापासून फायदा घेतला पाहिजे. असे सांगून अजून पुरस्कार विजेते कबड्डीपटू व प्रशिक्षक शांताराम जाधव म्हणाले,” क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी आता भरपूर संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेऊन खेळाडूंनी या क्षेत्रात सर्वोत्तम करिअर कसे करता येईल हे लक्षात ठेवले पाहिजे. चांगल्या करिअर बरोबरच स्वतःला आदर्श व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी क्रीडाक्षेत्र हे उत्तम व्यासपीठ आहे याचीही जाणीव खेळाडूंनी ठेवली पाहिजे.”

▪️ अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू व प्रशिक्षिका शकुंतला खटावकर यांनी सांगितले,” खेळाडूंना अतिशय अनुभवी व ज्येष्ठ प्रशिक्षकांकडून सर्वोत्तम प्रशिक्षण मिळाले आहे. स्वतःकडे असलेले कौशल्य पणाला लावून महाराष्ट्राला अधिकाधिक सुवर्णपदके कशी मिळतील असा प्रयत्न खेळाडूंनी केला पाहिजे.”

▪️ खेळाडूंनी फक्त महाराष्ट्राला पदके कशी मिळवता येतील याचा विचार न करता आपल्याला येथील पदकांचा फायदा घेत जागतिक स्तरावर करिअर करायचे आहे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. खेळाडूंनी अल्प संतुष्ट न राहता सतत सर्वोच्च यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे असे आवाहन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक निखिल कानेटकर यांनी केले.
खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा शुभेच्छा समारंभाप्रसंगी अनिल चोरमुले यांनी प्रास्ताविक केले. सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page