अग्निवीर अक्षय गवतेंना सियाचीनमध्ये वीरमरण; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

Spread the love

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील शहीद अक्षय गवते यांना सियाचीनमध्ये वीरमरण आले. आज त्यांच्या मुळगाव असलेल्या पिंपळगाव सराई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय गवते देशातील पहिला शहीद अग्निवीर ठरला आहे. याआधी कर्तव्यावर असलेल्या पंजाब येथील अग्निवीराला शहीदचा सन्मान मिळाला नव्हता, त्यावर मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अक्षय गवते या अग्निवीराला शहिदाचा सन्मान मिळाल्याने अक्षय गवते देशातील पहिला शहीद अग्निवीर ठरला आहे.

शहीद अग्नीवीर अक्षयवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना पोलिसांकडून हवेत ३ राऊंड फायर करून शहीद अक्षय गवतेला सलामी देण्यात आली. शहीद अग्नीवीर अक्षय गवतेला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. इतर सैनिकांना ज्याप्रमाणे शासकीय सुविधा मिळतात त्याच धर्तीवर शहीद अग्निवीर अक्षय गवतेला सुविधा मिळाव्यात यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करणार असल्याचं खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.

आज सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव पिंपळगाव सराई येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातलग, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची रीघ लागली. या वीर जवानाच्या पार्थिवाची गावातून परिक्रमा काढण्यात आली. यावेळी हजारो देशप्रेमींच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुलगाव (वर्धा) येथील जवान व पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. वडील लक्ष्मण गवते यांनी मुखाग्नी दिला.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, संजय गायकवाड, धीरज लिंगाडे, माजी आमदार विजयराज शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, स्वाभिमानीचे रविकांत तुपकर, शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके, सेनेचे नरेंद्र खेडेकर, बुलढाणा एसडीओ राजेंद्रसिंह जाधव, तहसीलदार रुपेश खंडारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाद्रन लीडर( निवृत्त) रुपाली सरोदे, सैनिक कल्याण संघटक विष्णु उबरहंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह हजारो शोकाकुल नागरिक हजर होते. शेकडो विद्यार्थी हाती तिरंगा घेऊन हजर होते. युनीट ६९ मैदानी रेजिमेंटमध्ये ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचिन ग्लेशियर भागात अक्षय गवते कर्तव्यावर होते. सैन्यात ९ महिने २१ दिवस सेवा दिली. २० ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावल्यानंतर मध्यरात्री झोपेतच हृदयाघात झाल्याने अक्षयची प्राणज्योत मालवली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page