एक्सर्बिया गृहप्रकल्पा विरोधात ग्राहक आक्रमक, कंपनीकडून फसवणूक ग्राहकांचा आरोप, मनसेकडे न्यायासाठी ग्राहकांचे साकडे ..

Spread the love

नेरळ : सुमित क्षीरसागर – आयुष्यात सर्वांची असणारी एक इच्छा स्वतःचे घर झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांची धडपड कायम असते. लोकांची हि गरज ओळखून एक्सर्बिया या गृह निर्माण कंपनीकडून वेगवेगळी प्रलोभने ग्राहकांना दाखवत आकर्षित केले. मात्र त्या ग्राहकांची कंपनीकडून फसवणूकच झाली असल्याचे समोर आले आहे. २०१७ साली पैसे भरलेल्या ग्राहकांना आजही सदनिकांचा ताबा मिळालेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेत नेरळ पोलीस ठाणे गाठले. तर यासह त्यांनी न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साकडे घातले आहे.
         
मुंबईच्या जवळ असल्याने रायगड जिल्ह्यातल्या कर्जत, खालापूर या तालुक्यातील जागांवर बांधकाम व्यावसायिकांची नजर पडली. त्यामुळे मागील काही काळात येथे गृह प्रकल्पांची नांदी आली. त्यातल्या त्यात कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात तानाजी मालुसरे सिटी, एक्सर्बिया सारख्या मोठमोठ्या गृह निर्माण कंपन्या आल्या. एक्सर्बिया यांचे कर्जत तालुक्यात व खालापूर येथे गृह निर्माण प्रकल्प सुरु आहेत, कर्जत तालुक्यात वरई, खाड्याचा पाडा येथे त्यांचे गृह निर्माण प्रकल्प मोठ्या स्वरूपात सुरु आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी बजेट होम, मुंबई जवळ, रेल्वे जवळ, पाणी, लाईट अशी वेगवेगळी प्रलोभन दाखवली. साहजिकच यामुळे ग्राहक वर्ग आकर्षित झाला. मात्र या सर्वाला भुलून आयुष्याची पदरमोड करून स्वप्नातील घर खरेदी करू पाहणाऱ्या खरेदीदारांची फसवणूक झाल्याचे चित्र आहे. अनेक प्रकरणातून कायम वादातीत राहिलेली एक्सबेरिया कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या अगोदर देखील कंपनीवर शेतकऱ्यांच्या शेत जमिनी बळकावण्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तर येथील कंपनीच्या मनमानी कारभारामुळे गावातील शेतकऱ्यांचे देखील शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. अशा एक ना अनेक प्रकरणात चर्चेचा विषय ठरलेल्या या कंपनीने ग्राहकांना अद्याप सदनिकांचे ताबा न दिल्याने ग्राहकांची मोठी फसवणूक झाली आहे. या गृह प्रकल्पात अनेकांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदीसाठी आयुष्याची पदरमोड केली आहे. परंतु अद्याप या कंपनीकडून ग्राहकांना घराचा ताबा देण्यात येत नसून ग्राहकांचे पैसे देखील परत केले जात नसल्याचा आरोप येथील खरेदीदारांनी केलाय तर कंपनी ग्राहकांशी बोलायला तयार नाही. साईट कार्यालयात ग्राहकांची उत्तरे देणारा जबाबदार अधिकारी नाही त्यामुळे ग्राहकांनी थेट मनसेचे दार ठोठावले आहे. या प्रकरणी आता मनसेने लक्ष घातले असून या प्रकाराबाबत मनसे आक्रमक झाली आहे. दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात नेरळ पोलीस ठाण्यात जमत कंपनी विरोधात रोष प्रकट केला. तर यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील हे देखील उपस्थित होते. तर पाटील यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात येत्या बुधवारी चर्चा करून ग्राहकांना दिलासा देण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. तेव्हा बुधवारी बैठकीत काय होत ते पाहू अन्यथा एक्सरबिया कंपनीला मनसेचे आंदोलन काय असते ते दाखवून देऊ असा इशारा पाटील यांनी दिला आहे. दरम्यान याबाबत एक्सर्बिया व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

एक्सर्बिया वांगणी येथे सदनिका खरेदीदारानी आमच्याकडे तक्रार केली आहे. गेले अनेक वर्षे या ग्राहकांनी घरासाठी पैसे भरून देखील त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली नाहीत तर पैसे देखील परत मिळाले नाहीत. काहींच्या घरात बँकेचे अधिकारी पैश्याच्या तगादा लावून आहेत. त्यामुळे ही सगळी सामान्य लोक निराश झालेली आहेत. या नैराश्यात कुणी जीवच बरं वाईट केलं तर त्याला जबाबदार कोण ? घरांचा ताबा देण्याचा कालावधी उलटून गेला आहे. तरी कंपनी या लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत. आमच्याकडे शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कंपनीने या ग्राहकांच्या तक्रारीवर निर्णय द्यावा नाहीतर कंपनीचा निर्णय मनसे लावेल.

: जितेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष मनसे रायगड

मी २०१७ साली एक्सर्बिया वांगणी येथे सदनिका घेण्यासाठी पैसे भरले होते. मात्र अद्याप आम्हाला घरांचा ताबा मिळालेला नाही. ज्येष्ठ नागरिक असून मी कोकणात राहते. मुंबईत स्वस्तात घर मिळतं म्हणून पैसे भरून मी फसले. घर मिळालं नसल्याने बँकेचे हप्ते देखील थकले आहेत.
: अनिता खानोलकर, ग्राहक

मी मुंबईत स्वस्तात घर मिळत असल्याने एक्सर्बियामध्ये पैसे भरले होते. आम्ही बँकेचे कर्ज घेऊन घर घेतलं आम्हाला लवकरच ताबा मिळेल असं सांगितलं मात्र अद्याप घरे मिळालेली नाहीत. घरी बँकेचे लोक येऊन बसतात. खूप त्रास सहन करावा लागतोय.

: रोहिणी सोनकवडे, ग्राहक

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page