
गेल्यावर्षी धोकादायक ठरलेल्या ठिकाणी पुन्हा धोका होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे निर्देश..
*नागपूर :* एकीकडे मे महिन्यात विशेषता नवतपा सुरू असताना पाऊस सुरू आहे. आज बुधवारी उपराजधानीत पावसाने चांगलीच हजेरी लावली. दुसरीकडे पाऊस आल्यावर पावसाळ्यापूर्वीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा तसेच पावसाळ्यात नागरिकांना मदत करण्यासाठी मदत यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.
पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी केलेल्या तयारीचा तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. गेल्यावर्षी धोकादायक ठरलेल्या ठिकाणी पुन्हा धोका होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. पावसाळ्यात अंबाझरी व फुटाळा तलावात पाणी भरल्यानंतर अनेकजण तेथे सेल्फी घेण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जातात. या तलावाच्या धोकादायक ठिकाणी पूर्ण सुरक्षा कठडे लावण्यात यावे तसेच २४ तास सुरक्षा रक्षक तैनात ठेवावे, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, गणेश राठोड, उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व झोनचे कार्यकारी अभियंता, बीएसएनएलचे, एमएसईबी, एसडीआरएफ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.